सिंधुदुर्ग :  तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला. याचं तौक्ते चक्रीवादळात देवगड बंदरात बुडालेल्या बोटीवरील एका खलाशाचा अजुनही मृतदेह भेटला नव्हता. त्या खलाशाचा आज चौदाव्या दिवशी मृतदेह वेंगुर्ले मधील सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर आढळला. प्रकाश काशीराम बिरिद यांचा हा मृतदेह असल्याची ओळख पटली आहे. त्या मृतदेहावर सागर तीर्थ येथे आज बिरीद कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


वेंगुर्लेतील आरवली - सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर अनोळखी कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. शिरोडा सागर रक्षक सुरज अमरे व राजाराम चिपकर यांना या मृतदेहाबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना संपर्क केला. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, पोलीस हेड कॉ. रंजीता चव्हाण, पोलीस नाईक वाय.एम. वेंगुर्लेकर आदींनी घटनास्थळी जात त्या कुजलेल्या स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान तो मृतदेह देवगड समुद्रात बुडालेल्या बोटीवरील खलाशाचा असावा असा अंदाज होता. 16 मे रोजी देवगड समुद्रात ही बोट बुडाली होती. त्या अनुषंगाने वेंगुर्ले पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी तो मृतदेह खलाशी प्रकाश बीरीद यांचा असल्याचे निष्पन्न झाले.


राजापूर येथील प्रकाश यांचे भाऊ प्रशांत आणि चुलत भाऊसंदीप तुकाराम बीरीद यांनी मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर कायदेशीर बाबी पूर्ण करून प्रकाश यांच्या मृतदेहावर सागरतीर्थ येते आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दोन्ही भाऊ, पोलीस नाईक वाय.एम. वेंगुर्लेकर उपस्थित होते.