Sangli Jat Water Issue: सांगलीतील जत तालुक्यातील त्या गावच्या पाण्याच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. म्हैसाळ पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं सुमारे दोन हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे जतमधील 48 गावे ओलिताखाली येणार आहेत. 


सध्याच्या  महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील आणि खासकरून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावांच्या पाणी प्रश्नावर लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री यांनी म्हैसाळ पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पालाच तत्वत: मान्यता दिली असून एक जानेवारीपासून याची निविदा प्रक्रियाही  सुरू होणार आहे. तब्बल दोन हजार कोटीच्या या प्रकल्पामुळे जत मधील 48 गावे ओलिताखाली येणार आहेत.


महाराष्ट्र शासनाने 2016-17 मध्ये या योजनेतील सुमारे 6 टीएमसी पाणी कर्नाटकला दिले होते. त्या बदल्यात तुबची बबलेश्वर योजनेतील पाणी जतच्या वंचित भागात देण्याबाबत पत्रव्यवहारही झाला होता. परंतु कर्नाटक सरकारने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जतमधील सुमारे 48 गावांमधील 30 हजार हेक्टर जमीन ओलिताविना राहिली. त्याचेच पडसाद नव्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर उमटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या निर्णयामुळे जतमधील पाण्याचे प्रश्नाची तीव्रता कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. 


जत तालुक्याचा उल्लेख कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर वादळ उठले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्याकडून तिथल्या प्रश्नांची माहिती घेतली. ताज्या माहितीनुसार म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेचा समावेश कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पात करण्यात आला त्यासाठी सुमारे दोन हजार कोटीचा खर्च लागणार आहे. त्याबाबत त्वरित पुढील कार्यवाही करावी आणि 1 जानेवारीपासून या कामाची निविदा प्रक्रिया काढून काम लवकरात लवकर सुरू करण्याचा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे. 


जत तालुक्यातील गावांचा पाणीप्रश्न सहा महिन्यांच्या आत पाण्याचा प्रश्नाचे मार्गी लावला नाही, तर कर्नाटकात सामील होण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या उमराणी ग्रामस्थांनी दिला होता. तर तिकोंडीत काही ग्रामस्थांनी गावातून फेरी काढत आणि मुख्यमंत्री बोम्मईंचा फलक गावच्या कमानीवर लावला होता.  


ही बातमी देखील वाचा


Maharashtra and Karnataka Border Dispute : तर कर्नाटकमध्ये जायला मागेपुढे पाहणार नाही! जत तालुक्यातील आता उमराणी ग्रामस्थांचा जाहीर इशारा, तिकोंडीत बोम्मईंचा फलक