Ruturaj Gaikwad : महाराष्ट्राचा लाडका खेळाडू ऋतुराज गायकवाडनं आज वादळी खेळी करत विश्वविक्रम केला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy 2022) क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केला.  ऋतुराज गायकवाड अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.


सामन्यानंतर एका वेबसाईटशी बोलताना ऋतुराज म्हणाला की, मला ही खेळी खेळून खूप भारी वाटतंय. आम्ही सामना जिंकलो आणि सेमीफायनलमध्ये पोहोचलो हे महत्वाचं आहे. लिस्ट ए मध्ये पहिलं द्विशतक केल्याचाही आनंद आहे, असंही ऋतुराज म्हणाला. 


ऋतुराज म्हणाला की, 49 वी ओव्हर ज्यावेळी सुरु झाली त्यावेळी मी विचार केला की, हा स्पिनर आहे. याला थोडंसं पुढं जाऊन खेळावं. मला प्रत्येक चेंडूवर बॉन्ड्री हवी होती. गोलंदाजाकडून चौथ्या चेंडूनंतर पाचवा चेंडू नो बॉल टाकला गेला. त्यावेळी फ्री हिटवर आपण सिक्स मारु शकतो असं वाटलं. सहा सिक्स झाल्यावर सातवा सिक्स हा चेरी ऑन द केक होता. आता सहा सिक्सर मारलेच होते तर विचार केला सातवाही मारु, आणि त्यात ही यशस्वीही झालो. 




एका षटकात सात सिक्स मारु असा मी कधीच विचार केला नव्हता. मात्र मी द्विशतक मारणार याबाबत मात्र मी आधी विचार केलेला होता. मी कुठलाही चेंडू खेळताना कोणत्या दिशेनं मारायचा असा विचार केलेला नव्हता. जिकडे चेंडू मिळाला तिकडे त्याला टोलावला, असं ऋतुराज म्हणाला. ही खेळी मी माझ्या संपूर्ण टीमला समर्पित करेल. आम्ही खूप मेहनतीनं इथवर आलो आहोत. तसंच महाराष्ट्र असोशिएशनलाही ही खेळी मी समर्पित करेल, असंही ऋतुराज म्हणाला.  


महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात आज क्वार्टर फायनल सामना खेळला गेला. या सामन्यात महाराष्ट्रानं उत्तरप्रदेशवर दणदणित विजय मिळवला.  महाराष्ट्रानं उत्तर प्रदेशसमोर 50 षटकात 331 धावांचं लक्ष्य ठेवलं. यात ऋतुराजनं अवघ्या 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी. ज्यात 10 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश होता. 


ही बातमी देखील वाचा


Ruturaj Gaikwad Record: मराठमोळ्या ऋतुराजचा वर्ल्ड रेकॉर्ड! एकाच षटकात ठोकले सात षटकार, अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच