चिन्मयी सुमीत मुंबईतील विलेपार्ले पूर्व भागातील पार्ले टिळक शाळेजवळ होत्या. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांच्याकडे पाहून हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. चिन्मयी यांनी त्याच्या श्रीमुखात भडकवण्याआधी तो पसार झाला. चिन्मयी यांचे पती, प्रसिद्ध अभिनेते सुमीत राघवन यांनी फेसबुकवरुन ही माहिती दिली.
सुमीत राघवन यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्परतेने आरोपीला बेड्या ठोकल्या. सुमीत राघवन यांनी पोलिसांचे आभार मानले आणि त्यांना सलाम ठोकला.
'देव न करो, मात्र दुर्दैवाने अशी वेळ कोणावर आलीच तर सहन करु नका. आवाज उठवा. पोलिसांत तक्रार दाखल करा' असं आवाहन सुमीत यांनी केलं.
अश्लील चाळे करणारी व्यक्ती बीएमडब्ल्यू कारचा ड्रायव्हर आहे. त्याच्या कारचे शेवटचे 4 नंबर 1985 असल्याचं सुमीत यांनी सांगितलं होतं. आरोपीने करड्या रंगाचा सफारी घातला असून कार नंबरच्या आधारे त्याचा शोध घ्या, असं आवाहन सुमीत यांनी आपल्या पोस्टमधून पोलिसांना केलं होतं. सुमीत यांनी पोलिसात या घटनेची तक्रार दाखल केली होती.
चिन्मयी सुमीत यांनी आभाळमाया, आकाशझेप, काटा रुते कुणाला यासारख्या मालिका, झंझावात, चेकमेट, पोरबाजार यासारखे चित्रपट केले आहेत. लेकुरे उंदड जाहली या नाटकात पती सुमीत राघवनसोबत त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती.