मुंबई : करण जोहरच्या प्रसिद्ध 'कॉफी विथ करण' शोमध्ये कोण पाहुणे हजेरी लावणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना असते. त्यातच नवदाम्पत्य विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 'कॉफी..'मध्ये हजेरी लावणार असल्याची चर्चा होती. मात्र अनुष्काच्या प्रवक्त्यांनी या चर्चा फोल असल्याचं सांगितलं आहे.

'परी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनुष्का सहनिर्माती प्रेरणा अरोरासोबत करण जोहरच्या शोमध्ये हजर राहील, तर विराट एका सेगमेंटपुरती हजेरी लावेल, असं म्हटलं जात होतं. मात्र आता चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी पडलं आहे.

'विराट आणि अनुष्का कॉफी विथ करणमध्ये सहभागी होणार नाहीत. 'कॉफी..'च्या पुढच्या सीझनमध्ये विरुष्का एकत्र हजेरी लावणार असल्याच्या अफवांमध्ये अजिबात तथ्य नाही. त्यामुळे या अफवा पसरवू नका' अशी विनंती अनुष्काच्या प्रवक्त्यांनी केली.

डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकल्यानंतर हा विराट आणि अनुष्काचा पहिला टेलिव्हिजन अपिअरन्स ठरला असता. विरुष्काची हॉट जोडी आपल्या कार्यक्रमात बोलवण्यासाठी साहजिक अनेक टीव्ही शो निर्मात्यांमध्ये चढाओढ असेल. मात्र तूर्तास तरी कोणत्याही चॅनेलला टीआरपी मिळवून देण्याचा या नवदाम्पत्याचा इरादा नाही.

विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून 24 फेब्रुवारीला परतणार आहे. तर अनुष्का शर्मा आगामी परी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.