Marathi Actress : 'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagla Premach) ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर (Star Pravah) येत्या 27 मेपासून सुरू होत आहे. या नव्या मालिकेची चाहत्यांना उत्सुकता आहे. मालिकेचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अशातच आता अभिनेत्री पूजा बिरारीने येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीत भाग घेतला आहे. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
स्टार प्रवाहवर 27 मे पासून सुरू होतेय नवी मालिका 'येड लागलं प्रेमाचं'. राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्र. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका. मालिकेत बैलगाडा शर्यतीचा एक सीन पाहायला मिळणार आहे. मंजिरीला बैलगाडा शर्यतीत भाग घ्यावा लागतो. ही स्पर्धा ती जिंकते का याची उत्सुकता असेल. या सीनचं शूट पंढरपुरात करण्यात आलं. अभिनेत्री पुजा बिरारीने शूटिंगच्या अनुभवाविषयी सांगितलं.
पूजा बिरारी काय म्हणाली?
पूजा बिरारी म्हणाली,"बैलगाडा शर्यत शूट करायची असं ठरल्यापासून मनात खूप उत्सुकता होती. मी कधीच बैलगाडी चालवली नाहीय. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव घेण्याची खुपच उत्सुकता होती. पंढरपुरात आम्ही ही बैलगाडा शर्यत शूट केली. जवळपास 4 ते 6 दिवस या खास भागाचं शूट सुरु होतं".
पूजा म्हणाली,"सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत आम्ही याच सीनवर मेहनत घेत होतो. मात्र टीममधल्या कुणाच्याही चेहऱ्यावर थकल्याचे भाव नव्हते. सीन अधिकाधिक चांगला कसा होईल याकडेच सर्वांचं लक्ष होतं. बैलगाडी चालवणं हे मोठं आव्हान तर होतंच पण त्यासोबतच बैलांसोबत जुळवून घेणं म्हणजे तारेवरची कसरत होती. बैलगाडी नुसती चालवायची नव्हती तर ती शर्यतीत पळवायची होती. त्यामुळे खूप काळजी घेऊन शूट करावं लागत होतं. आमच्या टीमने सर्वांचीच उत्तम सोय केली होती. दिग्दर्शकासोबतच बैलांच्या खऱ्या मालकांनी देखिल मला बैलगाडी चालवण्याचे धडे दिले. मी हा सीन बॉडी डबलची मदत न घेता केला.
पूजा पुढे म्हणाली,"शूटिंगच्या दिवशी सगळे गावकरी हा सीन पहाण्यासाठी जमले होते. खरतर खूपवेळा रिटेक्स झाले. मात्र आम्ही सर्वांनी हा सीन हताश न होता पूर्ण केला. मालिकेतला राया म्हणजेच अभिनेता विशाल निकमने या सीनसाठी मला खूप मदत केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बैलांसोबत मी हा सीन शूट केला त्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांची मी नेहमी ऋणी असेन. माझ्यासाठी हा अतिशय विलक्षण आणि अविस्मरणीय अनुभव होता. हा अनुभव माझ्या आठवणींच्या शिदोरीत कायम असेल. हा सीन स्क्रीनवर कसा दिसणार हे पहाण्यासाठी मी उत्सुक आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका येड लागलं प्रेमाचं 17 मे पासून रात्री 10.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर".
संबंधित बातम्या