Tujhi Majhi Jamli Jodi : 'तुझी माझी जमली जोडी' (Tujhi Majhi Jamli Jodi) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमो आऊट झाल्यापासून प्रेक्षक या मालिकेची प्रतीक्षा करत आहेत. मैत्री असावी तर अस्मिता देशमुख आणि संचित चौधरी यांच्यासारखीच हे दाखवणारी ही मालिका असेल. 11 डिसेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


मैत्री ही अशी निरागस गोष्ट आहे ना की ती एकदा झाली की ती कशाचा भेदभाव करत नाही. एखाद्या सोबत केलेली मैत्री जर कायमस्वरूपी टिकवली तर त्या व्यक्तीने खूप काही कमावले असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाही. मैत्री हा विषय घेऊन 'तुझी माझी जमली जोडी' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 


मैत्रीची सुंदर गोष्ट उलगडणारी 'तुझी माझी जमली जोडी' 


एक ही शब्द न बोलता डोळ्यातील भाव ओळखणारी मैत्री जर तुमच्या नशिबात असेल तर तुम्ही जगातील सर्वात नशिबवान व्यक्ती असाल. नशिबात मैत्रीची साथ असेल सारं काही शक्य असतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मैत्री ही उलगडत जाते, फुलत जाते आणि नकळतपणे खूप काही शिकवून जाते. अशाच मैत्रीची सुंदर गोष्ट 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेत उलगडणार आहे. 




'मैत्री श्रीमंतीचा नाही तर मनाचा मोठेपणा बघते' हे वाक्य पटवून देण्यासाठी 11 डिसेंबरपासून  'तुझी माझी जमली जोडी' ही नवीन मालिका येत आहे. दोन अनोळखी व्यक्ती, त्यांच्यात झालेली मैत्री, मैत्रीच्या नात्यामुळे त्या दोघांमध्ये झालेले विचारांचे आदान प्रदान आणि मैत्रीमुळेच फुलणारं त्यांचं प्रेम अशी या मालिकेची गोड गोष्ट आहे. 


अभिनेत्री अस्मिता देशमुख आणि अभिनेता संचित चौधरी ही नवीन जोडी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ही नवीन जोडी, त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी खात्री वाटते. नुकतेच या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे आणि मालिकेचे प्रोमो पाहून प्रेक्षकांनी त्यांची या मालिकेप्रती आतुरता देखील दाखवली आहे.


स्नेहलता वसईकर दिसणार खलनायिकेच्या भूमिकेत 


खलनायिका किंवा खलनायक यांच्याशिवाय दोन व्यक्तींचं प्रेम किंवा मालिकेची कथा पुढे कशी सरकणार ना... कथेमध्ये ट्विस्ट तर हवाच. तर 'तुझी माझी जमली जोडी' मध्ये अभिनेत्री स्नेहलता वसईकर खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.  स्नेहलता वसईकर साकारणार असलेल्या भूमिकेचं नाव 'भैरवी' आहे जी संचित चौधरीची आत्या दाखवली आहे. श्रीमंत घराण्याला शोभेल असं दिमाखदार, सुंदर व्यक्तिमत्त्व , शिष्टाचाराने वागेल असा स्वभाव, आणि अर्थात श्रीमंतीचा गर्व असणारं असं हे 'भैरवी'चं पात्र आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत स्नेहलता वसईकर यांना पाहणं रंजक ठरणार आहे.