Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेत दयाबेनची व्यक्तीरेखा चांगलीच लोकप्रिय आहे. मात्र, मागील वर्षभरापासून ही व्यक्तीरेखा मालिकेतून गायब झाली आहे. मालिकेत दयाबेनला दाखवण्यात येत नाही. या शोमध्ये दिशा वकानीही दयाबेनची भूमिका अदा करते. मात्र, दिशा वकानी बाळंतपणाच्या सुट्टीवर गेली होती. त्यानंतर दिशाने या मालिकेत पुनरागमन केले नाही. सध्या ती आपलं सगळं लक्ष बाळाच्या संगोपनावर देत आहे.
मालिकेत दयाबेनसाठी चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आता या शोमध्ये मिसेस सोधीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री दयाबेनशी संबंधित एक गुपित सांगताना दिसत आहे. अभिनेत्रीने सांगितले की निर्माते या भूमिकेसाठी 3 वर्षांपासून एका मुलीचे ऑडिशन घेत आहेत.
28 वर्षाच्या मुलीची ऑडिशन
व्हायरल व्हिडिओमध्ये जेनिफर म्हणत आहे - ती 100 टक्के दया आहे. एक बिचारी मुलगी 3 वर्षांपासून ऑडिशन देत आहे. कधी तिला दिल्लीतूनही फोन केले जातात. ही मुलगी खूपच तरुण आहे. कदाचित 28-29 वर्षांची आहे. वयात खूप अंतर दिसतंय म्हणून तिच्या निवडीबाबत निर्णय होत नाही. पण ती आवाजाने एकदम दया असल्याचे जेनिफरने सांगितले. आम्ही तिच्यासोबतमॉक टेस्टही शूट केली. दिलीप जी, टपू सेना या सर्वांचे वेगवेगळे मॉक शूट होते. त्या मुलीचा चेहरा वेगळा आहे, पण तयारी असेल आणि डोळे बंद केले तर फरक सांगता येणार नसल्याचा दावा जेनिफरने या व्हायरल होणाऱ्या मुलाखतीत केला आहे.
मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी सांगितले होते की, ते दया भाभीची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत. लवकरच दयाबेनच्या भूमिकेसाठी कोणाला तरी कास्ट करणार असून शक्य तितक्या लवकर दयाबेनची शोमध्ये एन्ट्री होईल असेही मोदी यांनी सांगितले.
दयाबेन पुनरागमन करत असल्याचे या शोमध्ये अनेकवेळा दाखवण्यात आल्याची माहिती आहे. दया तिच्या आई-वडिलांच्या घरातून गोकुलधाम सोसायटीत परतत आहे, पण दया अजून शोमध्ये आलेली नाही. या शोमध्ये कोणती अभिनेत्री दयाबेनच्या भूमिकेत येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.