अशोक सराफ हे नाव माहीत नाही असा एकही इसम भारतात सापडणार नाही. कारण या अस्सल कलाकाराने आपल्या अनेक मराठी-हिंदी चित्रकृतीमधून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या अशोक सराफ यांचं 'व्हॅक्यूम क्लीनर' हे नाटक रंगमंच गाजवतं आहे. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही त्याच उत्साहानं अशोकमामा आपली भूमिका निभावताना दिसताहेत. त्यांना भक्कम साथ मिळाली आहे ती निर्मिती सावंत यांच्यासारख्या चतुरस्र अभिनेत्रीची. नाटक असल्यामुळे अनेक किस्से घडत असतात. असाच हा किस्सा आहे साक्षात अशोक सराफ यांच्याबद्दलचा. नाटक सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले असताना आधीची कमिटमेंट म्हणून मामांना सिनेमाच्या शूटसाठी आठ दिवस तालीम थांबवून शूटला जावं लागलं. पण तिथेही त्यांनी जे काही करून दाखवलं ते वाचाल तर थक्क व्हाल.


पहिला किस्सा.. 

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित आणि लिखित 'व्हॅक्यूम क्लीनर' हे नाटक आता बसत आलं होतं. फूट स्टेप्स ठरल्या. म्हणजे, कोणत्या संवादाला कुणी कुठे जायचं.. कुठे जाऊन कुणाकडे पाहायचं या सगळ्या गोष्टी ठरल्या. आणि मामांना शूट आलं. मग करणार काय? नाटकाची तालीम होणं अत्यंत आवश्यक होतं. मग चिन्मयने त्याचा असिस्टंट मामांचं चित्रिकरण सुरू असलेल्या लोकेशनवर पाठवायचं ठरलं. ठरल्या वेळी मामांकडे हा असिस्टंट जायचा. मामा आपला सिनेमातला शॉट देऊन व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसलेले असायचे. हा मुलगा आला की मामा तडक नाटकाची संहिता घेऊन उभे राहायचे. आणि व्हॅनिटीमध्ये हा असिस्टंट आणि मामांची तालीम सुरू व्हायची. मामा सोडून इतर सगळ्यांचे संवाद हा असिस्टंट म्हणायचा आणि मामा तालीम करायचे. सिनेमातला शॉट लागला की शूट करायला जायचे आणि पुन्हा येऊन तालीम व्हायची. वयाच्या सत्तरीतही मामांचा तोच उत्साहं होता. नाटक करताना काही चुकू नये, आपल्यासह सहकलाकारांचा गोंधळ उडू नये म्हणून ही खबरदारी मामा घेत होते. आठएक दिवसांत शूट संपलं आणि मामा पुन्हा तालमीच्या ठिकाणी हजर झाले. याबद्दल अशोक सराफ 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाले, 'सिनेमाचं शूट ही माझी जुनी कमिटमेंट होती. तिला नाकारणं शक्य नव्हतं. नाटकही काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं. मग शेवटचा पर्याय तोच होता. कारण तालीम करणं महत्वाचं होतं. माझ्यासाठी आणि सहकलारांसाठी. पण त्यासाठी त्या असिस्टंटनेही नेमाने मेहनत घेतली.'

खरंतर अशोक सराफ यांच्यासारख्या अभिनेत्याने चित्रिकरण संपवून तालीम केली असती तरी त्यांना कुणीच काही बोललं नसतं. किंबहुना आठ दिवसांचा बॅकलॉग सराफ यांनी भरूनही काढला असता, पण तसं स्वत:ला गृहित न धरता सराफ यांनी नेटाने तालीम केली आणि नाटक उभं राहिलं.

दुसरा किस्सा..

अशोक सराफ यांचा हा किस्सा ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल. कारण प्रचंड इच्छाशक्ती.. कमिटमेंट आणि सहकलाकाराबद्दल असलेला आदर याशिवाय हे शक्य नाही हे खरं. आज आपण पदोपदी स्वार्थी होत असताना अशोक सराफ यांनी घालून दिलेलं उदाहरण हे खरोखरीच त्यांना हिमालयापेक्षा मोठं बनवणारं आहे. तर हा किस्सा असा, 'व्हॅक्यूम क्लीनर' नाटकाची तालीम ऐन रंगात आली होती. नाटकाला आता काही दिवस उरले होते. तालीम करता करता अचानक अशोक सराफ यांच्या मानेपासून पाठीत कळ आली. मामांची मान कमालीची दुखू लागली. त्या वेदनेनं मामा काही क्षण विचलीत झाले. पण त्यांनी तालीम सोडली नाही. ही बाब लक्षात आली या नाटकाचा दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर याच्या. मामा संवाद तर म्हणताहेत. पण नेहमीसाऱखी भट्टी जमलेली नाही हे त्याच्या लक्षात आलं. पण काय होतंय ते मामा काही सांगेनात. पण त्यांच्या ड्रायव्हरकरवी मामांना मानेला झालेली दुखापत त्याला कळली. गंमत अशी की असं अधेमधे होतं म्हणून मामा नेहमी आपल्यासोबत एक स्प्रे बाम ठेवतात. तो त्यांच्याकडे होता. पण तरीही तो त्यांनी वापरला नाही. आता तुम्ही म्हणाल, इतकं दुखतं तर लावायचा ना बाम. बरं वाटलं असतं. पण याचं कारण आम्ही जेव्हा साक्षात मामांना विचारलं, तेव्हा त्यांचं उत्तर ऐकून मात्र आम्ही आवाक झालो. ते म्हणाले, ' माझी मान दुखायला लागली होती. फिरत फिरत संवाद म्हणताना अचानक मानेला हिसका बसला आणि मान दुखायला लागली. मग मला काही सुचेना. बाम होता माझ्याकडे. पण तो मी मारला नाही. कारण त्याचा फार घाण वास येतो. उग्र असा. तो लावला की बाकीच्यांना खूप त्रास झाला असता. त्यांनाही संवाद म्हणायचे होते. मग उगाच तो उग्र वास घेत त्यांना संवाद म्हणावे लागले असते. म्हणून मी तो बाम मारायंच टाळलं.' हे कळल्यानंतर मात्र चिन्मय हतबुद्ध झाला. दिवसभर मामांनी तशी तालीम केली. त्यानंतरच त्यांनी बाम लावला आणि ते घरी गेले.

अशोक सराफ हा खूप मोठा नट, कलाकार आहेच. पण आजही माणूस म्हणून ते त्याहीपेक्षा मोठे आहेत. असे अनेक किस्से त्यांच्याबाबत बोलले जातात. माणूस मोठा होतो तो उगाच नाही. होय ना?