Mandar Chandwadkar : सध्या छोट्या पडद्यावरची ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रचंड चर्चेत आली आहे. नुकतेच या मालिकेतील एका कलाकाराने या शो ला अलविदा केल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर, दुसरीकडे या मालिकेतील एका कलाकाराचे निधन झाल्याची अफवा देखील सोशल मीडियावर जोरदार पसरली होती. या अफवांमुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे चाहते नाराज झाले होते. या लोकप्रिय मालिकेमध्ये ‘आत्माराम तुकाराम भिडे’ यांची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) यांचे निधन झाल्याचे बोलले जात होते. पण, आता त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर लाईव्ह येऊन मंदारने स्पष्ट केले की, ही केवळ अफवा होती, वास्तव नाही.
यासोबतच त्याने आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे की, या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि ज्या कोणी ही अफवा पसरवली आहे, त्यांनी ती पसरवणे तत्काळ थांबवावे. अशा अफवांना लोकांनी फॉरवर्ड करणे देखील टाळले पाहिजे.
काय म्हणाले ‘भिडे मास्तर’?
त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर लाईव्ह येत मंदार म्हणाला, 'नमस्ते, कसे आहात सगळे? मला आशा आहे की, तुम्ही सर्व बरे असाल. मी पण माझ्या कामात व्यस्त आहे. पण, मी एक बातमी ऐकली त्यामुळे मला वाटले की, लोक नाराज होण्याआधी मी लाईव्ह येऊनच तुम्हाला सर्वकाही सांगावे. सोशल मीडियावर अफवा आगीपेक्षा वेगाने पसरतात. मला फक्त हे सांगयचे होते की, मी शूटिंग करत आहे आणि मी एकदम ठीक आहे.’ यानंतर अभिनेत्याने असेही म्हटले की, 'जो कोणी ही अफवा पसरवत आहे, मी त्यांना अशा अफवा पसरवणे थांबवा ही विनंती करतो. देव त्यांना सद्बुद्धी देवो. तारक मेहता का उल्टा चष्माचे सर्व कलाकार पूर्णपणे निरोगी आणि आनंदी आहेत.’
या व्हिडीओत अभिनेता मंदारने म्हटले की, तो आणि त्याची संपूर्ण टीम अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते आणि या पुढेही करणार आहेत. मंदारच नाही तर याआधी दिव्यांका त्रिपाठी, मुकेश खन्ना, श्वेता तिवारी, शिवाजी साटम यांच्यासह अनेक कलाकारांच्या मृत्यूची अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. यानंतर कलाकारांनाच लोकांसमोर येऊन या अफवांना पूर्णविराम द्यावा लागला होता.
हेही वाचा :
Rang Majha Vegla : दीपिकाची खोटी आई घरी येणार! लेकीसमोर कार्तिकचं बिंग फुटणार?
Shailesh Lodha : शैलेश लोढा 'तारक मेहता' मालिकेचा घेणार निरोप? शूटिंग करणं केलं बंद