Mumbai Metro Car Shed : मुंबईतील मेट्रो कारशेड आरेतच (Aarey Colony) बनवण्याचा निर्णय नवनिर्वाचित शिंदे सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे. आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. तर, दुसरीकडे काही लोक या आरेतील कारशेडच्या निर्णयाला पाठिंबा देत आहे. यावरून बरेच वादही निर्माण झाले आहेत. आता या प्रकरणी अभिनेते सुमीत राघवन (Sumeet Raghvan) यांनी देखील एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमधून त्यांनी सरकारला हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे.


मेट्रोचे कारशेड आरेतच बनणार या सरकारच्या निर्णयाला अभिनेते सुमीत राघवन यांनी ट्वीट करत पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी ट्विटर पोस्ट लिहित नवनिर्वाचित सरकारला एक विनंती केली आहे.


काय म्हणाले सुमीत राघवन?


अभिनेते सुमीत राघवन यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी लिहिलेय की, ‘एक वेगळा व्हॉईस ऐका. मी स्वतः नेहरू नगर, कुर्ला (पू)चा आहे. आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की, हा वाद आता पुरे. आम्हाला @MumbaiMetro3 ही लवकरात लवकर सुरू व्हायला हवी आहे. राहिला मुद्दा कारशेडचा, तर #CarShedWahiBanega.. म्हणजे कुठे? तर #आरे मध्येच.


@Dev_Fadnavisजी @mieknathshindeजी कळकळीची विनंती करतोय की, आता ह्याच्यावर एकदाचा पडदा पाडा. हे नाटक दर दोन वर्षांनी सुरू राहिलं तर अर्थ नाही.  जे मुंबईकर माझ्या मताशी सहमत आहेत त्यांनी आता आवाज करणं गरजेचं आहे. एक प्रोजेक्ट धड होऊ नये? पैसा,जीव,वेळ..काही किंमत आहे की नाही?’


दोन वर्षांपासून वाद सुरूच


2019 साली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा घेतला होता. त्याआधी देवेंद्र फडणवीस असताना या कामाला गती मिळाली होती. खुद्द पंतप्रधान मोदींनी या कामाचं उद्घाटन केलं होतं. जवळ जवळ अडीच ते तीन हजार वृक्ष असल्याचा दावा वृक्षप्रेमींनी केला होता. हजारो लोक तत्कालीन फडणवीस सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले होते. याविरोधात पर्यावरणप्रेमी कोर्टात देखील गेले होते. गेल्या दोन वर्षांपासून हा वाद अजूनही सुरूच आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या