Aarey Metro Car Shed : आरे कारशेडविरोधात पर्यावरणवादी पुन्हा एकवटणार आहे. पर्यवरणप्रेमींनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे देखील आरे बचाव मोहमेसाठी मैदानात आले आहे. 'आरे' कारशेडबाबत 'नव्या उपमुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करावा', अशी मागणी करणारी पोस्ट अमित ठाकरेंनी केली आहे.
अमित ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुणांनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं . आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊ नका. पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस राहणार नाही.
एकीकडे राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना शुभेच्छा देत आहे तर दुसरीकडे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी शिंदे सरकारच्या पहिल्याच निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 'आरे'च्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन ठाकरे भावांमध्ये एकमत असल्याचं पाहायला मिळतंय.
मुंबईतल्या आरे कॉलनीमधल्या जंगलावरून पर्यावरणप्रेमींबरोबर मनसेचाही विरोधी सुरू झाला आहे. तर उद्धव ठाकरेंनीही नव्या सरकारच्या आरे संदर्भातील निर्णयाचा विरोध केला आहे. 2019 साली एका रात्रीत 'आरे'मध्ये मेट्रो कारशेडच्या बांधणीसाठी 2700 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडांची कत्तल करण्यास रात्रीच्या काळोखाचा आधार घेण्यात आला होता. सामान्य जनतेला आणि पर्यावरणप्रेमींना ही बाब लक्षात येताच त्यांनी 'आरे'कडे धाव घेतली आणि मोठं जनआंदोलन झाले होते. त्यामुळे आता पुन्हा आरे वाचवण्यासाठी मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :