Sumeet Pusavale : अभिनेता सुमीत पुसावळे (Sumeet Pusavale) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' (Balumamachya Navan Changbhala) या मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. त्याने साकारलेली बाळूमामांची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली. या मालिकेनंतर पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सुमीत पुसावळे सज्ज आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli) या नव्या मालिकेत तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.


'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत हृषिकेशच्या भूमिकेत दिसणार सुमीत पुसावळे! 


18 मार्चपासून स्टार प्रवाहवर (Star Pravah) सुरु होणाऱ्या 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून ज्या हृषिकेश बद्दल इतकं भरभरुन बोललं जातंय त्या हृषिकेषची भूमिका नेमका कोणता कलाकार साकारणार याची कमालीची उत्सुकता होती. अखेर त्या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार आहे. 


हृषिकेशची व्यक्तिरेखा साकारणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सुमीत पुसावळे. सुमीतला याआधी आपण अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटलोय. मात्र हृषिकेश ही व्यक्तिरेखा त्याने आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी आहे.


घरोघरी मातीच्या चुली मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना सुमीत म्हणाला, "मी याआधी साकारलेल्या भूमिकेतून बाहेर पडून काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतोय. ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकेनंतर कौटुंबिक मालिकेत काम करण्याचा अनुभव घेतोय त्यामुळे प्रेक्षकांप्रमाणेच मी देखिल उत्सुक आहे. या मालिकेकडे पहाण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच वेगळा आहे. खूप चांगले कलावंत मालिकेत आहेत. एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे".






सुमीत पुढे म्हणाला,"मला असं वाटतं, एकत्र कुटुंब ही रणदिवे कुटुंबाती खरी ताकद आहे. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, की एक लाकडाची काठी तोडणं सोपं आहे मात्र लाकडाची मोळी तोडणं तितकंच अवघड. त्यामुळे कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे". 


सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


घरोघरी मातीच्या चुली
कधी सुरू होणार? १८ मार्चपासून
किती वाजता? सायंकाळी 7.30 वाजता 
कुठे पाहाल? स्टार प्रवाह


संबंधित बातम्या


Ashutosh Patki : आशुतोष पत्कीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन; 'या' नव्या मालिकेत झळकणार