Sukh Kalale : मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी महाराष्ट्राची लाडकी वाहिनी 'कलर्स मराठी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे नवी मालिका 'सुख कळले' (Sukh Kalale). सामान्य माणसाची असामान्य गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवलेला सागर देशमुख (Sagar Deshmukh) हा या मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेत तो माधव ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने सागर देशमुखसोबत साधलेला हा दिलखुलास संवाद.


1.) 'सुख कळले' मालिका करण्याचं का ठरवलं?


कलर्स मराठीमधून केदार शिंदे आणि सुगंधा लोणीकर यांनी मला मालिकेसाठी विचारणा केली होती. त्यांनी मला या मालिकेचं कथानक ऐकवलं. मालिकेची गोष्ट मला प्रचंड आवडली. मालिकेला एका कथेचं खूप छान कुंपण आहे. त्यामुळे लगेचच मी मालिका करण्यासाठी होकार कळवला. 


2.) 'सुख कळले' मालिकेचं वेगळेपण काय?


'सुख कळले' या मालिकेत प्रेक्षकांना खरी पात्रं दिसणार आहेत. प्लॅस्टिकच्या जगात अनेक नाट्यमय घडामोडी दाखवल्या जातात पण या मालिकेत प्रेक्षकांना असं काही पाहायला मिळणार नाही. नाट्य नक्कीच असणार आहे. कारण नाट्य नसेल तर गोष्टीला मजा येत नाही. पण अतिरेक नसेल". 


3.) सामान्य माणसाची असामान्य गोष्ट दाखवणं तुझ्यासाठी किती चॅलेजिंग आहे?


साधेपणा हा क्लिष्ट शब्द आहे खरंतर... कारण साधेपणा दाखवणं खूप कठीण असतं. याआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पु.ल. देशपांडे यांच्या व्यक्तिरेखा मी साकारल्या आहेत. या व्यक्तिरेखांचा अभ्यास तुलनेनं सोपा आहे. पण सामान्य माणसाचं पात्र साकारताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शोधून काढाव्या लागतात. काही गोष्टी ठरवाव्या लागतात. हे एखाद्या अभिनेत्यासाठी नक्कीच चॅलेजिंग असतं. 


4.) माधव हे पात्र साकारताना काय विशेष मेहनत घेतली आहेस?


सीन आल्यानंतर तो व्यवस्थित लक्षात ठेवून त्या पात्राला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. मालिकेचा प्रवास आता सुरू झाला असून पात्राबद्दलच्या अनेक गोष्टी आता या प्रवासात सापडत आहेत. 


5.) तुझ्यासाठी 'सुख कळले' म्हणजे नक्की काय?


मनापासून एखादं काम केल्यानंतर जे आत्मिक समाधान मिळतं ते माझ्यासाठी 'सुख कळले' होय.


6.) 'सुख कळले'च्या निमित्ताने स्पृहाकडून काय शिकायला मिळतंय?


स्पृहाची उत्स्फूर्तता मला प्रचंड आवडते. टीव्ही विश्वातला तिच्याकडे दाडंगा अनुभव आहे. त्यामुळे टेक्निकल गोष्टीदेखील तिच्याकडून शिकायला मिळत आहेत. 


7.) स्पृहा आणि तुझी ऑफस्क्रीन केमिस्ट्री कशी आहे?


स्पृहा आणि माझी ऑफस्क्रीन केमिस्ट्री खरंच खूप छान आहे. कारण स्पृहाच्या 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' या मालिकेचा मी संवादलेखक होतो. तेव्हापासूनच स्पृहा ही माझी चांगली मैत्रीण आहे. मला असं वाटतं की, ऑफस्क्रीन मैत्री नसेल तर ती ऑफस्क्रीन क्वचितच दिसते. परंतु आमचा चांगला बॉन्ड असल्यामुळे स्पृहासोबत स्क्रीन शेअर करताना मजा येत आहे.


8.) कलर्स मराठीसोबत काम करतानाचा अनुभव कसा आहे?


कलर्स मराठीसोबत काम करतानाचा अनुभव अत्यंत चांगला आहे. मालिकेची कथा तसेच संपूर्ण टीम खूप चांगली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना मजा येत आहे. निर्माते सोहम बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर ही अत्यंत चांगली माणसं आहेत. त्यांना कलाकारांच्या समस्याही कळतात आणि ते दोघेही कलाकार असल्याने त्यांना प्रत्येक गोष्टीचं भान आहे. एकंदरीतच कलर्ससोबत काम करतानाचा अनुभव खूपच सुखद आहे.


संबंधित बातम्या


Spruha Joshi : स्पृहा जोशीला “सुख कळले!!” अन् बरंच काही...