Spruha Joshi : 'कलर्स मराठी'वर (Colours Marathi) येत्या 22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या 'सुख कळले' (Sukh Kalale) या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) 'मिथिला' ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमानंतर 'सुख कळले' या मालिकेच्या माध्यमातून स्पृहा पुन्हा एकदा कलर्स मराठीसोबत जोडली गेली आहे. अभिनेत्रीने नुकतचं 'सुख कळले'बद्दल भाष्य केलं आहे.
1.) तुझ्यासाठी 'सुख कळले'ची व्याख्या काय?
'सुख कळले' ही रोज उठून शोधण्याची गोष्ट असते. धकाधकीच्या आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टींमधला आनंद आपण हरवून टाकलेला असतो. हा आनंद शोधणं म्हणजे 'सुख कळले' होय.
2.) मिथिला या भूमिकेबद्दल काय सांगशील?
मिथिला ही सर्वसामान्य गृहिणी आहे. तिच्या संसारात ती आनंदी आहे. तिने तिचे-तिचे निर्णय घेतलेत. तिने तिचा नवरा निवडला आहे. आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता तिने त्याच्यासोबत लग्न केलंय. या सगळ्यात तिनं स्वत:चं करिअर बाजूला ठेवलं आहे. माधव आणि मिथिलाची खूप छान टीम असून दोघे मिळून संसाराचा खेळ खेळत आहेत. मिथिला हे बऱ्यापैकी माझ्या जवळ जाणारं पात्र आहे. आजच्या काळातील गृहिणीची भूमिका साकारताना मला मजा येत आहे..
3.) तुझ्यासाठी सुख कळले मूव्हमेंट कोणती होती?
आम्ही सगळेच कलाकार खूप स्वार्थी असतो. आपल्याला चांगलं काम मिळावं, असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. आधी केलेल्या भूमिकांपेक्षा नव्या भूमिकेतून काही मिळतंय का, याकडे माझं लक्ष असतं. दररोज शूटिंग करत असताना साकारत असलेल्या पात्राकडून एखादी गोष्ट सापडली तर ती माझ्यासाठी सुख कळले मूव्हमेंट असते. माझी धाकटी बहीण क्षिप्रा जेव्हा झाली तेव्हा मी पाच वर्षांची होते. तिला पहिल्यांदा जेव्हा मी हातात घेतलं होतं ती माझी आतापर्यंतची सुख कळलेची सगळ्यात सुंदर मूव्हमेंट आहे.
4.) 'सुख कळले' मालिकेबद्दल प्रेक्षकांना काय सांगावसं वाटतं?
'सुख कळले' मालिकेबद्दल स्पृहा म्हणाली, "साध्या माणसांच्या गोष्टी फार सांगितल्या जात नाहीत. फार टोकाच्या गोष्टी आपण पाहत असतो. या सगळ्यात मध्यम मार्ग काढणारी ही मालिका आहे, असं मला वाटतं. मूळ कथेवर केदार शिंदे यांची घट्ट पकड आहे. मी आणि सागर सारख्या पद्धतीचा अभिनय करतो. आता या मालिकेसाठी प्रेक्षकांप्रमाणे आम्हीदेखील खूप उत्सुक आहोत. 'सुख कळले'च्या माध्यमातून आम्ही नवा प्रयत्न करत आहोत. त्याला जर प्रेक्षकांची साथ नसेल तर काही गंमत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी ही मालिका नक्की पाहावी. मालिकेची गोष्ट प्रेक्षकांना आपलीशी वाटेल त्यामुळे जास्तीतजास्त मालिकाप्रेमी ही मालिका पाहतील, अशी मला आशा आहे. अत्यंत सहज आणि हलकेफुलके मालिकेचे संवाद आहेत. "
5.) स्पृहाचा खऱ्या आयुष्यातील नवऱ्यासोबतचा बॉन्ड कसा आहे?
कोणतीच रिलेशनशिप परफेक्ट नसते. नात्यात जुळवून घ्यावंच लागतं. आयुष्यात आलेल्या नव्या व्यक्तीसोबत आपलं कधीच पटत नाही. पण या सगळ्यात शेवटी उरतं काय तर ती मैत्री असते. एकमेकांसोबत कोणतीही गोष्ट शेअर करता येणं, जर चूक असेल तर ते प्रामाणिकपणे पार्टनरला सांगावंसं वाटणं यातला जो बॉन्ड आहे तो वरद (माझा नवरा) माझा खूप चांगला मित्र असल्याने शक्य होतं. नात्यातला छोट्या गोष्टीतला आनंद आपल्याला काढता यायला हवा.
6.) कलर्स मराठीसोबतच्या ऋणानुबंधाबद्दल काय सांगशील?
'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमानंतर मी पुन्हा एकदा कलर्स मराठीसोबत जोडली गेली आहे. कलर्स मराठी आणि माझे ऋणानुबंध खूपच छान आहेत. निवेदिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून मला स्वत:ला जोखून बघायला मिळणार आहे. कलर्स मराठीने 'सुख कळले' या मालिकेच्या माध्यमातून मला ही संधी दिली आहे. अतिशय सुंदर गोष्ट, छान सहकलाकार, उत्तम टीम, सोहम प्रोडक्शनसारखं प्रोडक्शन हाउस अशा सर्व छान गोष्टी जुळून आल्या आहेत. त्यामुळे काम करायला मजा येत आहे.
7.) सागरसोबत काम करतानाचा अनुभव कसा आहे?
'सुख कळले'च्या माध्यमातून सागर आणि माझी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत काम करताना नक्कीच खूप मजा येत आहे.
संबंधित बातम्या