मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवर ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या कार्यक्रमाचा दुसरा सीझन सुरु आहे. पहिल्या सीझनमधील अँकरिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेणारा अभिनेता गश्मीर महाजनीची जागा आता अभिनेते अजिंक्य देव यांनी घेतली आहे. आता या कार्यक्रमाचा महाएपिसोड येत्या रविवारी दाखवण्यात येणार आहे. खोट्या प्रतिष्ठेचा ‘पिंजरा’ असं या खास भागाचं नाव आहे.
प्रेमा तुझा रंग कसा या कार्यक्रमातून प्रेमाचे विविध रंग आणि त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना दाखवण्यात येतात. रविवार 30 सप्टेंबरला अशीच एक अनोखी गोष्ट ‘पिंजरा’ या खास भागातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘पिंजरा’ म्हटलं की सर्वांना मराठीतील प्रसिद्ध सिनेमा आठवतो. प्रेमा तुझा रंग कसामधील खास भागही त्याच धाटणीचा आहे.
ही गोष्ट आहे लावणीसम्राज्ञी मेनकाची, तिच्या रुपावर भुललेल्या संग्रामची आणि आपल्या फायद्यासाठी मेनकाला मिळवू पाहणाऱ्या सागरची. तमाशाचे फड रंगवणाऱ्या मेनकेची पंचक्रोशीत चर्चा असते. पैशांचा माज असलेल्या संग्रामला मेनकेविषयी माहिती मिळते आणि तिच्या शोधात तो निघतो. पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडतो. पण गोष्ट इथेच संपत नाही. संग्राम आणि मेनकेच्या या लव्हस्टोरीमध्ये एण्ट्री होते ती सागरची. सागर त्याच्या सिनेमासाठी एका लावणी डान्सरच्या शोधात असतो, आणि त्याला मेनकाविषयी समजतं. तिथेच सुरुवात होते नव्या युद्धाला. मेनकावर जीव ओवाळून टाकणारा संग्राम विरुद्ध सागर अशी जंग छेडली जाते. प्रेमाच्या या लढाईत विजय नेमका कुणाचा होतो? याची रंजक गोष्ट म्हणजे ‘प्रेमा तुझा रंग कसा’चा महाएपिसोड.
खास बात म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांच्या खुमासदार शैलीने या महाएपिसोडची रंगत आणखी वाढणार आहे. रविवारी 30 सप्टेंबरला दुपारी 1 आणि संध्याकाळी 7 वाजता हा एपिसोड स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.
https://www.facebook.com/StarPravahOfficial/videos/757512257927215/
PROMO : https://www.facebook.com/StarPravahOfficial/videos/757512257927215/