मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो अर्थात ‘बिग बॉस’च्या बाराव्या मोसमाची सुरुवात झाली आहे. प्रीमियर एपिसोडमध्ये अभिनेता सलमान खानने या मोसमातील 17 स्पर्धकांची ओळख करुन दिली. यंदाच्या मोसमात 65 वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा हे त्यांच्या 28 वर्षीय गर्लफ्रेण्ड जसलीन हिच्यासोबत बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत.


बिग बॉसच्या बाराव्या मोसमाचा भाग बनून अनुप जलोटा यांनी एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. अनुप जलोटा हे बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सर्व मोसमातील सर्वाधिक मानधन घेणारे स्पर्धक ठरले आहेत. त्यांना प्रत्येक आठवड्याला 45 लाख रुपये मानधन दिले जाणार आहे.

याआधी बिग बॉसमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत टीव्ही अभिनेत्री हिना खान हिचे नाव पहिल्या स्थानी होते. तिला आठवड्याला 40 लाख रुपयांचे मानधन दिले जात होते. हिना खान अकराव्या मोसमात बिग बॉसची स्पर्धक होती.

प्रीमियर एपिसोडमध्ये बिग बॉसच्या व्यासपीठावर अनुप जलोटा यांनी आणखी एक धक्का सर्वांना दिला, तो म्हणजे, त्यांनी पहिल्यांदाच जसलीनसोबत गर्लफ्रेण्ड असल्याचे मान्य केले.

दरम्यान, बिग बॉसमध्ये सहभागी होण्याआधी ज्यावेळी अनुप जलोटा यांना जसलीनबाबत प्रश्न विचारले गेले, त्यावेळी त्यांनी अफवा असल्याचे म्हटले होते. जसलीनने मात्र अनुप जलोटांसोबत साडेतीन वर्षांपासून डेट करत असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. आता तर अनुप जलोटा यांनी थेट बिग बॉसच्या व्यासपीठावरुनच दोघांच्या नात्याबद्दल माहिती दिली आहे.