Premachi Gosht: 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेमाची गोष्ट  या मालिकेमध्ये  नात्यांची गुंफण दाखवण्यात येणार आहे. चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विभिन्न स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात आणि त्यांच्यातलं प्रेम कसं बहरत जातं हे सांगणारी सुंदर,तरल कथा म्हणजे प्रेमाची गोष्ट ही मालिका. मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत मुक्ता म्हणजेच तेजश्री प्रधानच्या आईची भूमिका  सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) साकारणार आहेत. प्रेमाची गोष्ट या मालिकेमधील भूमिकेबाबत शुभांगी गोखले यांनी माहिती दिली.


प्रेमाची गोष्ट मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना शुभांगी गोखले म्हणाल्या, ‘या मालिकेतील प्रत्येक पात्र महत्त्वाचं आहे. या मालिकेत मी मुक्ताच्या आईची म्हणजेच माधवी गोखले ही व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारं असावं असं मला वाटतं. त्यामुळे मी साकारत असलेलं पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात कसं राहिल यासाठी माझा प्रयत्न असतो. या मालिकेत मी साकारत असलेलं पात्र शिस्तप्रिय आहे. साधेपणातलं सौंदर्य जपणारं आणि संस्कृतीशी घट्ट नाळ जपणारं. तेजश्री प्रधान आणि मी एका मराठी सिनेमात माय-लेकीची भूमिका साकारली होती. पुन्हा एकदा आम्ही दोघी मालिकेच्या निमित्ताने एकत्र आलोय. तेजश्री उत्तम अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करायला मला खूप आवडतं. अभिनयात खूप ठेहराव असणारी आणि सतत काहीतरी नवं शोधणारी तेजश्री मला खूपच भावते. हे पात्र आणि ही मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे अश्या शब्दात शुभांगी गोखले यांनी आपली भावना व्यक्त केली.’






 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या प्रोमोमध्ये मुक्ता कधीही आई होऊ शकत नाही. पण तिच्या आईला तिच्या लग्नाची खूप उत्सुकता असते. त्यामुळे मुक्ताचं लग्न जुळावं यासाठी ती प्रयत्न करत असते. 


 'प्रेमाची गोष्ट'  या मालिकेत शुभांगी गोखले यांच्यासोबतच तेजश्री प्रधान, राज हंचनाळे,  संजीवनी जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ही मालिका चार सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Premachi Gosht : तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा प्रोमो आऊट; नेटकरी म्हणाले,"ये है मोहोब्बतें'चा रिमेक