Premachi Gosht : मालिकाविश्नात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. गेल्या काही दिवसांत टीआरपीमुळे अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या नव्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो आऊट झाला आहे.


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने (Tejashri Pradhan) काही दिवसांपूर्वी आपण छोट्या पडद्यावर कमबॅक करत असल्याची घोषणा केली होती. तेजश्रीच्या या नव्या मालिकेचं नाव 'प्रेमाची गोष्ट' असं आहे. या मालिकेचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.


'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मुक्ता आणि सागरच्या प्रेमाची गोष्ट मालिकाप्रेमींना पाहायला मिळणार आहे. मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री प्रधान तर सागरच्या भूमिकेत राज हंचनाळे दिसणार आहे. तेजश्री आणि राज पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 






 'प्रेमाची गोष्ट'च्या प्रोमोमध्ये काय आहे? 


 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या प्रोमोमध्ये मुक्ता कधीही आई होऊ शकत नाही. पण तिच्या आईला तिच्या लग्नाची खूप उत्सुकता असते. त्यामुळे मुक्ताचं लग्न जुळावं यासाठी ती प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे सागर हा एका मुलीचा वडील आहे. आपली लेक सईला आईसारखं प्रेम देणारं कोणी नाही त्यामुळे तो दुसरं लग्न करण्यासाठी टाळाटाळ करताना दिसत आहे. दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यामुळे आता सईमुळे ते एकमेकांच्या प्रेमात पडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहावी लागेल. 


 'प्रेमाची गोष्ट'  या मालिकेत तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेचा प्रोमो पाहून ही मालिका 'ये है मोहेब्बतें' या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.  'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमुळे 'रंग माझा वेगळा' ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.


छोटा पडदा गाजवणारी तेजश्री प्रधान!


'होणार सून मी ह्या घरची', 'लेक लाडकी या घरची','प्रेम हे', 'अग्गंबाई सासूबाई' अशा अनेक मालिकांमध्ये तेजश्रीने काम केलं आहे. 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेत तेजश्रीने साकारलेली जान्हवीची भूमिका चांगलीच गाजली. आता तिच्या  'प्रेमाची गोष्ट' या मालिकेची चाहत्यांना उत्सुकता आहे.