मुंबई : 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी 'शक्तिमान'चा पुढचा सिझन लवकरच येत आहे. नव्या पर्वातही मुकेश खन्नाच मुख्य व्यक्तिरेखा साकारत असून पंडित गंगाधर विदयाधर मायाधर ओमकारनाथ शास्त्रीचा शक्तिमान कसा झाला, हे या सिझनमध्ये पाहायला मिळणार आहे.


 
नव्या पर्वामध्ये शक्तिमानच्या बालपणीचा काळ दाखवला जाणार आहे, असं मुकेश खन्ना यांनी सांगितलं आहे. जिथे पहिल्या पर्वाचा समारोप झाला, तिथूनच दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. सात गुरुंकडून खडतर शिक्षण घेतल्यानंतर गंगाधरचा शक्तिमान कसा झाला, हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 
'शक्तिमानच्या पूर्वायुष्याचा भाग मला त्यावेळीच दाखवायचा होता. मात्र त्यासाठी चाहत्यांच्या लाडक्या शक्तिमानला काही भागांसाठी ऑफ स्क्रीन जावं लागलं असतं. त्यामुळे निर्मात्यांनी मला परवानगी दिली नाही.' असं खन्ना यांनी सांगितलं. नव्या पर्वात बालपणीच्या गंगाधरच्या व्यक्तिरेखेसाठी आमच्या नजरेत काही चेहरेही आहेत, त्याचप्रमाणे काही संकल्पनाही आहेत, असंही ते म्हणाले.

मुकेश खन्ना यांनी पुनरागमनासाठी तब्बल 8 किलो वजन घटवलं आहे. गीता विश्वास, तमराज किल्वीश, डॉ. जयकाल यासारख्या व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहेत. डीडी वाहिनीवर रोज संध्याकाळी 6 ते 6.30 वाजताचा टाईम स्लॉट मिळवण्यासाठी बोलणी सुरु आहेत. ते झाल्यास कलर्स, सोनी यासारख्या वाहिन्यांनाही सॅटेलाईटद्वारे शो प्रक्षेपित करण्यासाठी विनवणी करणार असल्याचं ते म्हणाले.