Prashant Damle : संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या ​फेलोशिप आणि पुरस्कारांची घोषणा आज (शुक्रवारी) करण्यात आली. यामध्ये 2019, 2020 आणि 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार मराठी रंगभूमीवरील चिरतरूण अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक प्रशांत दामले (Prashant Damle) यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे


नुकतेच प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे 12 हजार 500 प्रयोग पूर्ण झाले. असा विक्रमी प्रयोग पार पाडणारे ते एकमेव कलाकार आहेत. त्यांच्या या मेहनतीची दखल घेत त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून प्रशांत दामले यांना 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. 


प्रशांत दामले यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्याची पोस्ट करत आपल्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, 'आपल्या सर्वांच्या अलोट प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला. असच प्रेम असु दे.' त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. चाहते त्यांच्या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.



शास्त्रीय गायनासाठी अमूल्य योगदान दिल्याबद्दल आरती अंकलीकर टिकेकर (Arati Ankalikar-Tikekar) यांनाही संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रशांत दामले आणि आरती अंकलीकर टिकेकर या दोघांनाही 2020 सालचा पुरस्कार जाहीर झाला आहे.


तर, ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका मीना नाईक (Meena Naik) यांना 2020 सालचा पपेट्रीसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


संगीत नाटक अकादमी पुरस्कार :


केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते. संगीत नाटक अकादमीतर्फे नृत्य, नाट्य आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येतो. संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा पुरस्कार संगीत नाटक अकादमी या कलाक्षेत्रातील सरकारी संस्थेतर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. संगीत, नृत्य अभिनय इतर पारंपरिक समूह नृत्य, आदिवासी नृत्य, संगीत, अभिनय आणि कठपुतळी यांतील योगदानांबद्दल हे पुरस्कार प्रदान केले जातात. 


महत्वाच्या बातम्या : 


Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; आवाज, नाव आणि प्रतिमा यांना संरक्षण देण्याची मागणी