Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनच्या (Bigg Boss Marathi Season 5) पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने निक्कीची चांगलीच शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं. बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही", असं म्हणत सुपरस्टार रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील पहिल्याच 'भाऊच्या धक्क्यावर' निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेताना पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या मराठीच्या पहिल्याच आठवड्यात अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं, पण आता याच सदस्यांचा भाऊच्या धक्क्यावर पाणउतारा केला जाणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. 


'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. 'बिग बॉस मराठी'च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने आणि डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेश भाऊ त्याच्या 'भाऊच्या धक्क्या'वर तिचा माज उतरवणार आहे.


ज्याला बोलायचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही - रितेश देशमुख


निक्की तांबोळी 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अनादर करताना दिसून आली. त्यामुळे रितेश भाऊ निक्कीची चांगलीच शाळा घेणार आहे. रितेश देशमुख निक्कीला म्हणाला,"वर्षां ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही.. त्यांचं कर्तृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय."                                                    


रितेश पुढे म्हणाला,"बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याला बोलायचं भान नाही..त्याला इथे स्थान नाही. महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार? 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हेदेखील मराठी माणसंचं ठरवणार".






ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi Season 5 : 'साऱ्यांना टाईट, करणार राईट... भाऊचा धक्का'; 'बिग बॉस मराठी'चं नवं गाणं