Rang Majha Vegla : ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एकीकडे कार्तिकीला तिच्या बाबांविषय सत्य कळलं आहे. तर, दुसरीकडे दीपिकाची खोटी आई बनून आलेली बाई देखील आता इनामदारांच्या घरातून बाहेर गेली आहे. सगळं काही सुरळीत सुरु असताना आता पुन्हा एकदा श्वेताच्या डोक्यात एक नवी जीवघेणी योजना आली आहे. मात्र, यावेळी तिच्या या प्लॅनमध्ये चिमुकली दीपिका अडकणार आहे.


आता कार्तिकीला तिच्या वडिलांबद्दलचं सत्य कळलं आहे. इतकी वर्ष दीपाने लपवून ठेवलेलं सत्य अखेर चिमुकल्या कार्तिकीसमोर आलं आहे. मात्र, या नंतर आता तिच्या मनात अनेक प्रश्नाचं काहूर माजलं आहे. कार्तिकीच्या बालमनाला असंख्य प्रश्न पडले आहे. तर, कार्तिक दीपाचा नवरा आहे, तर आपण त्याचीच मुलगी आहोत, हे त्याला का माहित नाही? तो आपल्याला का स्वीकारत नाही?, असे अनेक प्रश्न कार्तिकीला पडले आहेत. आपल्या मनातील हे सगळे प्रश्न विचारून ती दीपाला हैराण करत आहे. तर, चिमुकल्या लेकीला उत्तरं तरी कशी द्यावीत, या विचारत दीपा देखील दुःखी झाली आहे.


दीपिकाला होणार गंभीर दुखापत!


नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये दीपिकाला गंभीर दुखापत झालेली दिसली आहे. श्वेताच्या कुरापती डोक्यात पुन्हा एकदा काहीतरी नवा कट शिजत आहे. श्वेता फरशीवर तेल ओतून स्वतःच्या रूममध्ये निघून जाते. ती तिथून गेल्यावर दीपिका खेळता खेळता तिथे येते आणि तेलावरून पाय घसरून समोरच्या ओट्यावर जोरात आदळते. दीपिकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडते. तिथे आलेला कार्तिक तिला पाहून घाबरतो आणि तपासू लागतो. त्यांच्या आवाजाने घरातील सगळे लोक तिथे जमा होतात. आता दीपिकाला नेमकं किती लागलंय आणि हे तिच्या जीवावर तर बेतणार नाही ना, हे येणाऱ्या भागांत कळणार आहे.  



पुन्हा एकदा मोडणार आयेशा-कार्तिकचं लग्न


एकीकडे दीपिकाला गंभीर दुखापत झाली आहे. तर, दुसरीकडे आयेशा कार्तिकसोबत लग्न करण्यासाठी कोर्टबाहेर त्याची वाट बघत आहे. मात्र, दीपिकाला गंभीर दुखापत झाल्याने कार्तिक मात्र स्वतःच्या लग्नाबद्दल पूर्णपणे विसरून जातो. कार्तिक वेळेत कोर्टात न पोहोचल्याने आयेशा आणि त्याचं लग्न पुन्हा एकदा मोडलं आहे. कार्तिकने पुन्हा एकदा आपली फसवणूक केली म्हणून आयेशा संतापली आहे. आता ती पुढे काय करणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.


संबंधित बातम्या