Bhirkit : अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' (Bhirkit) हा सिनेमा  येत्या 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 'भिरकीट'चा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटामध्ये हास्याचे फवारे घेऊन मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचे बादशाह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 


तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा


'भिरकीट' या सिनेमात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद,  श्रीकांत यादव, मीनल बाळ, शिल्पा ठाकरे, दिप्ती धोत्रे, आर्या घारे, सेवा मोरे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नामदेव मिरकुटे, राधा सागर,मी अश्विनी बागल यांच्यासारख्या जबरदस्त कलाकारांची मांदियाळी असून हे सगळेच कलाकार आपल्या धमाल विनोदी शैलीने सिनेमागृहात अक्षरशः हास्यकल्लोळ करणार आहेत. त्यांची ही धमाल पाहण्यासाठी प्रेक्षकही प्रचंड उत्सुक आहेत. 


गिरीश कुलकर्णी आगळ्यावेगळ्या भूमिकेत 


गिरीश कुलकर्णी 'भिरकीट' सिनेमात एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ते या सिनेमात 'तात्या' ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. जो नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून जाणारा आहे. गावातील प्रत्येक स्त्री तिची व्यथा घेऊन 'तात्या'कडे सोडवायला जाते. असा हा सदैव सेवेसाठी तत्पर असणारा 'तात्या' प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवणार असून अशा प्रकारची भूमिका गिरीश कुलकर्णी यांनी पहिल्यांदा साकारली आहे. तर सागर कारंडे आपल्याला एक धमाल राजकारण करताना दिसणार आहे. तो 'बंटी दादा' ही भूमिका साकारत आहे. याव्यतिरिक्त हृषिकेश जोशी, कुशल बद्रिके, तान्हाजी गालगुंडेही आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांना लोटपोट हसवणार आहेत. या चित्रपटात विनोदाचे बादशाह असल्याने 'भिरकीट' चित्रपटगृहात धुमाकूळ घालणार आहे. 


'भिरकीट'चे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणाले, 'भिरकीट' या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील अनेक विनोदवीर आहेत, ज्यांनी आजवर अवघ्या महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने हसवले आहे. या सिनेमातील प्रत्येक विनोदवीराची अनोखी विनोदशैली आहे. त्यांच्या हसवण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचे हसवण्याचे आपापले वेगळे टाईमिंग आहे आणि हे असे वेगवेगळे विनोदवीर एकत्र 'भिरकीट'मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हास्याचे जबरदस्त पॅकेज आपल्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक ज्यावेळी विरंगुळा म्हणून चित्रपटगृहात एखादा चित्रपट पाहायला जातो, तेव्हा त्याला निव्वळ मनोरंजन हवे असते, अशा वेळी 'भिरकीट' त्यांच्या या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल. प्रेक्षक केवळ हसणारच नाही तर त्यातून एखादा संदेशही घेऊन जातील.'


संबंधित बातम्या


Bhirkit : गिरिश कुलकर्णींच्या 'भिरकीट' सिनेमातील ‘लाईन दे मला’ गाणं रिलीज; 17 जूनला सिनेमा होणार प्रदर्शित


Bhirkit : 'भिरकीट' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित; गिरिश कुलकर्णी आव्हानात्मक भूमिकेत