Ram Mandir Inauguration: अयोध्या राम मंदिराच्या (Ram Mandir Inauguratio) भव्य उद्घाटन सोहळ्याची तयारी सध्या उत्साहात सुरू आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूड तसेच टॉलिवूडमधील कलाकार देखील सहभागी होणार आहेत. 'रामायण' या लोकप्रिय मालिकेतील प्रभू श्री रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल (Arun Govil) यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. पण 'रामायण' या मालिकेतील लक्ष्मण ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी (Sunil Lahri) यांना या भव्य कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यामुळे ते नाराज झाले आहेत. सुनील लाहिरी यांनी याबाबत एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले सुनील लाहिरी?
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील लाहिरी यांनी सांगितलं की, 'प्रत्येक वेळी तुम्हाला बोलावलेच पाहिजे असे नाही. मला बोलावले असते तर मी नक्कीच गेलो असतो. मला आमंत्रित केले असते तर चांगले झाले असते. मलाही इतिहासाचा भाग होण्याची संधी मिळाली असती, पण हरकत नाही. पण याबाबत काळजी करण्यासारखे काही नाही.
'रामायण' मालिकेच्या निर्मात्यांनाही निमंत्रित करण्यात आलेले नाही, यावरही सुनील लाहिरी यांनी आश्चर्य व्यक्त केलं. ते म्हणाले, 'कदाचित त्यांना वाटत असेल की, मालिकेतील लक्ष्मणाचे पात्र तितकेसे महत्त्वाचे नाही किंवा त्यांना मी वैयक्तिकरित्या आवडत नाही. मी प्रेमसागर यांच्यासोबत होतो, पण त्यांनाही आमंत्रण मिळालेलं नाही. मला हे विचित्र वाटते की त्यांनी रामायणाच्या कोणत्याही निर्मात्यांना आमंत्रित केले नाही."
सुनील लाहिरी पुढे म्हणाले, 'कुणाला निमंत्रित करायचे की नाही, हा समितीचा वैयक्तिक निर्णय आहे. मी ऐकले की 7000 पाहुणे आणि 3000 VIP आमंत्रित आहेत. त्यामुळे मला वाटते की त्यांनी रामायण मालिकेशी संबंधित असलेल्यांना, विशेषत: मुख्य कलाकार आणि निर्मात्यांनाही आमंत्रित करायला हवे होते.'
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना राम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट,अनुपम खेर यांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: