Priyadarshini Indalkar : पुणे विद्यापीठातील (Pune University) ललित कला केंद्राकडून (Lalit Kala Kendra) काही दिवसांपूर्वी 'जब वी मेट' हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आक्षेप घेत कलाकारांना मारहाण केली. त्याशिवाय, ललित कला केंद्राची तोडफोड केली. कलाकार विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीचा निषेध सगळीकडून करण्यात आला. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरने (Priyadarshini Indalkar) देखील हल्ल्याचा निषेध केला होता. तशी तिने एक पोस्ट इन्स्टा स्टोरीवर लिहिली होती. मात्र, या पोस्टनंतर आपल्याला भयंकर अनुभवातून जावे लागले असल्याचे प्रियदर्शनीने म्हटले.
ललित कला केंद्रावर हल्ला झाल्यानंतर प्रियदर्शनीने आपल्या पहिल्या पोस्टमध्ये “ललित कला केंद्र, पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करुन नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध…”, अशी स्टोरी तिने पोस्ट केली होती. त्यानंतर तिला ट्रोलिंग, धमकीला सामोरे जावे लागले असल्याचे प्रियदर्शनीने म्हटले. प्रियदर्शनीने इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ललित कला केंद्रावरील हल्ला का चुकीचा आहे, असे सांगणारी पोस्ट लेखक-अभिनेता हितेश पोर्जे यांनी लिहिली आहे.
प्रियदर्शनीने शेअर केलेल्या त्या पोस्टमध्ये काय म्हटले?
मी काही ललित कला केंद्राचा विद्यार्थी नाही. नाटक अथवा फिल्मशी संबंधित कुठल्याच इंस्टिट्यूटचा पार्ट नाही. पण गेल्या आठवड्यात झालेल्या ललित कला केंद्राच्या वादानिमित्त काही गोष्टी मनात आल्या त्या इथे मांडत असल्याचे हितेश यांनी म्हटले.
विदर्भापासून ते कोकणापर्यंतच्या कित्येक छोट्या छोट्या गावांतून अनेक मुलं-मुली इथे शिकायला येतात. पुणे शहरात आपसूकपणे अंगावर येणारे सामाजिक-सांस्कृतिक गुंते मोकळे करत कष्टाने नाटकं उभी करतात, प्रयोग करतात. लोककला आणि पाश्चात्य नाट्यकलेचे प्रशिक्षण घेत खऱ्या अर्थाने संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे हितेश पोर्जे यांनी म्हटले.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, संपूर्ण प्रकरण ज्या नाटकाभोवती फिरतंय, त्याचा संपूर्ण प्रयोग हल्लेखोरांनी पाहिलेला नाही. नाटकाचा जो फॉर्म वापरला गेलाय तो समजून घेऊन त्याबद्दल त्यांनी चर्चा करण्याची, वाद घालण्याची हिंमत दाखवली नाही. सो कॉल्ड धर्म-संस्कृतीरक्षक हे असे असतांना देशाला आणि संस्कृतीला कोण कुठे पोहोचवतंय ह्यात कंफ्यूजन व्हायलाच नको असा मुद्दाही त्यांनी मांडला.
प्रकरण इतकं मोठं झाल्यावर पुढच्या वर्षी एखादा पालक आपल्या मुला-मुलीला ललितमध्ये प्रवेश घ्यायला लगेचंच परवानगी देईल का? नाही दिली परवानगी तर नुकसान कुणाचं? तर अगदी आत्मियतेने नाटक-अभिनय शिकू पाहणाऱ्या निमशहरी, खेड्यातल्या मुलांचं. नाटक-फिल्मद्वारे जातीय आणि धार्मिक वर्चस्वाला आव्हान देण्याची गरज असतांना ही पॅरेलेल सोशल सेंसरशिप आपली मुळं आतवर रुजवणार. हे असंच वाढत राहिलं तर नुकसान कुणाचं!? असा सवालही पोर्जे यांनी उपस्थित केला आहे.