Sachin Goswami On ABVP Attack Pune University : पुणे विद्यापीठातील (Pune University) ललित कला केंद्राकडून (Lalit Kala Kendra) काही दिवसांपूर्वी 'जब वी मेट' हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आक्षेप घेत बंद असलेल्या ललित कला केंद्राची तोडफोड करत कलाकारांना मारहाण केली. या घटनेचे पडसाद उमटत असून कलाकारांनी या तोडफोडीचा आणि मारहाणीचा निषेध केला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या (Maharashtra Chi Hasya Jatra) कार्यक्रमाचे लेखक सचिन  गोस्वामी (Sachin Goswami) यांनी आता अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्याकडे मागणी केली आहे. प्रशांत दामले यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना लोककला या प्रकाराची माहिती द्यावी, अशी मागणी गोस्वामी यांनी केली आहे. 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्यावतीने 'जब वी मेट'हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकात प्रभू श्रीराम आणि सीता यांचा कथित अपमान केला असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटकात गोंधळ घातला. कलाकारांना मारहाण करत ललित कला केंद्राची तोडफोड केली. पोलिसांनी ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह 6 जणांना अटक केली. या घटनेचे राज्यातील कलाविश्वात तीव्र पडसाद उमटले. अनेक कलाकारांसह आणि ललित कला केंद्राचे माजी विद्यार्थी असलेल्या कलाकारांनी या मारहाणीचा विरोध केला. 


सचिन गोस्वामी काय म्हणाले?


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे लेखक सचिन  गोस्वामी (Sachin Goswami) यांनी  ललित कला केंद्रावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनाच साद घातली आहे. प्रशांत दामले यांनी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि  लोकप्रिय जेष्ठ कलावंत या नात्याने ललित कला केंद्रात जाऊन दोन्ही गटांशी बोलून त्यातील तथ्य जाणून ABVP च्या कार्यकर्त्यांना लोककला या प्रकाराची माहिती देऊन..गैरसमज कमी करून एकोपा निर्माण करणे आणि कलावंतांना निर्भय वातावरण निर्माण करणे अपेक्षित असल्याचे गोस्वामी यांनी म्हटले. असे झाल्यास तरच अखिल भारतीय नाट्य परिषदेला मातृ संस्था म्हणता येईल. दामले यांनी पुढाकार घेऊन सामोपचाराने तोडगा काढावा ही विनंती आणि अपेक्षा असल्याचे गोस्वामी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले. 



प्रियदर्शनी इंदलकरनेही केला निषेध 


महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) हीने देखील झालेल्या तोडफोडीचा निषेध केला. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून या प्रकारावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून तिने अभाविपच्या कृत्याचा निषेध केलाय. "ललित कला केंद्र, पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करुन नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध.."अशी प्रतिक्रिया प्रियदर्शनी इंदलकर हिने व्यक्त केली