मुंबई : 'भाभीजी घर पे है' या गाजलेल्या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री सौम्या टंडन आई झाली. सौम्याने 14 जानेवारीला मुलाला जन्म दिला.


बाळाच्या इवल्याशा पायांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सौम्याने ही गोड बातमी चाहत्यांना सांगितली. 'हाय. तुमच्या जगात पाऊल ठेवत आहे, असं तो म्हणतोय, खरं तर त्याने माझ्या मनातच उडी घेतली आहे' असं कॅप्शन सौम्याने दिलं. त्यानंतर  'अवर बंडल ऑफ जॉय' असं कॅप्शन देत तिने पती आणि बाळासोबतचा फोटोही शेअर केला.

आपण प्रेग्नंट असल्याची बातमी इन्स्टाग्रामवर शेअर करताना सौम्याने भावनिक पोस्ट लिहिली होती. सौम्याने आपल्याला जादूगाराचं फीलिंग येत असल्याची भावना त्यावेळी व्यक्त केली होती.


'भाभीजी घर पे है' या प्रसिद्ध मालिकेत सौम्याने साकारलेली अनिता मिश्रा ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. आधी शिल्पा शिंदे आणि सध्या शुभांगी अत्रे साकारत असलेल्या अंगुरी भाभी इतकेच या 'गोरी मेम'चेही चाहते आहेत. सौम्याने जब वि मेट चित्रपटात करिनाच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

2016 मध्ये तिने बँकर सौरभ देवेंद्र सिंहशी विवाह केला. दोघांची ओळख कॉलेजमध्ये झाली होती. त्यानंतर काही वर्ष ते लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते.