मुंबई : स्ट्रगलर कलाकारांना चित्रपट-मालिकांमध्ये काम देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. 'कृष्णा चली लंदन' या हिंदी मालिकेत भूमिका देण्याच्या बहाण्याने मुंबईत 70 ते 75 जणांची लूट करण्यात आली.
28 वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनिअर अविनाश शर्मा आणि कुंभारकाम करणारा 31 वर्षीय विनोद ठाकूर या दोघांनी अनेकांची फक्त आर्थिक फसवणूकच केली नाही, तर मालिकेत काम करण्याचं आमिष दाखवून स्वप्नभंग केला. आरोपींना 11 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
'कृष्णा चली लंदन' मालिकेत काम करण्यासाठी कलाकारांची गरज असल्याची माहिती मुख्य आरोपी अविनाश शर्माने 'ऑडिशन इंडिया' या वेबसाईटवरुन मिळवली. या वेबसाईटवर ज्या इच्छुकांनी आपली माहिती दिली होती, त्यांचा संपर्क नंबर किंवा इमेल आयडी त्याने मिळवला. स्वतःला टीव्ही सिरीयलचा निर्माता भासवून त्याने अनेक जणांशी संपर्क साधला.
मालिकेत भूमिका देण्याच्या आमिषाने अविनाश इच्छुकांकडून 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली. पण कोणालाही काम न देता तो वेगवेगळ्या ईमेल आयडी आणि फोन नंबरवरुन अनेकांची फसवणूक करत राहिला.
पोलिसांच्या माहितीनुसार आतापर्यंत दोघांनी 70 ते 75 जणांना फसवलं आहे. यामध्ये मुंबईसोबतच राज्यातील आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या तरुण मंडळींचाही समावेश आहे.
तरुणांनी कुठलीही खातरजमा केल्याशिवाय एखाद्या आमिषाला बळी पडू नये आणि कोणालाही पैसे देऊ नयेत. सोशल मीडियावर आलेल्या कुठल्याही माहितीची खात्री करुन घ्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
'कृष्णा चली लंदन' मालिकेत भूमिकेचं आमिष, 75 जणांची आर्थिक फसवणूक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jan 2019 01:51 PM (IST)
'कृष्णा चली लंदन' मालिकेत भूमिका देण्याच्या बहाण्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर अविनाश शर्मा याने विनोद ठाकूरच्या साथीने 70 ते 75 जणांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार मुंबईत समोर आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -