Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात आज नेहा शितोळे आणि शिव ठाकरेची एन्ट्री होणार आहे. नेहा आणि शिव घरातील सदस्यांना विशेष टिप्स देणार आहेत. शिव आणि नेहाच्या अचानक झालेल्या एन्ट्रीने घरातील सदस्य खूश झालेले आहेत. तर दुसरीकडे आज एका सदस्याचा बिग बॉसचा प्रवास संपणार आहे. घरातील सदस्य सेफ झाले आहेत का ते कळण्यासाठी बिग बॉसने परिक्षा घेतली होती. त्यात पास किंवा एटीकेटीच्या पद्धतीत सदस्य परिक्षेत पास झाले आहेत की नापास झाले आहेत ते कळणार आहे. 

Continues below advertisement


कालच्या भागात बिग बॉसच्या घरातून तृप्ती ताई, मीनल आणि विशाल पास झाले आहेत तर सोनाली, दादूस, स्नेहा, सुरेखा ताई, विकासला एटीकेटी लागली आहे. त्यामुळे या आठवड्यात सोनाली, दादूस, स्नेहा, सुरेखा ताई, विकास यांच्यापैकी एका स्पर्धकाला घराबाहेर जावे लागणार आहे. प्रोमोमध्ये महेश मांजरेकर त्या स्पर्धकाचे नाव जाहीर करताना दिसत आहेत. नाव जाहीर करण्याआधीच घरातील सर्व सदस्यांच्या डोळ्यात पाणी आहे. पण नियमाप्रमाणे घरातील एका सदस्याचा आज प्रवास संपणार आहे. 


काल बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेताना दिसून आले होते. काल मांजरेकर मीराला म्हणाले, "मीरा पुढच्या वर्षी तु 'मीच बॉस' नावाचा कार्यक्रम सुरू कर". सलग तिसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टन नाही. हा मुद्दादेखील मांजरेकरांनी कालच्या भागात उचलून धरला. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टन झाला असता. पण तृप्ती देसाईं संचालक असताना निर्णय घेण्यास अपात्र ठरल्या होत्या. त्यावर महेश मांजरेकरांनी तृप्ती देसाईला सुनावले. मागील रविवारी आदिश वैद्यची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली होती. पण तो घरात येताच घरातील सदस्यांमध्ये नावडता ठरला होता. त्यामुळे या आठवड्यात देखील नवा सदस्य बिग बॉसच्या घरात येणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 


बिग बॉसच्या घरातला हा आठवडा टास्क, भांडणांमध्ये गेला असला तरी नवरात्री विशेष कार्यक्रमांनी प्रेक्षकांसोबत स्पर्धकांचेदेखील मनोरंजन केले आहे. बिग बॉसच्या घरात आठवडाभर स्पर्धकांनी टास्कसोबत मजादेखील केली. घरातील सदस्य नवरंगाप्रमाणे पेहराव करत दिसून आले होते. तर स्पर्धकांसाठी 'नवरात्री विशेष' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदस्यांसाठी विविध पदार्थ बिग बॉसतर्फे देण्यात आले होते. त्यावर सदस्यांनी ताव मारला. तर खास नवरात्री विशेष गाण्यावर सदस्यांनी ठेका धरला होता.


आज बिग बॉसच्या घरात सदस्य काय धुमाकुळ घालणार, घरातील कोणत्या सदस्याचा प्रवास थांबणार, नेहा शितोळे आणि शिव ठाकरे सदस्यांना काय सल्ले देणार, घरात नव्या सदस्याची एन्ट्री होणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.