Bigg Boss Marathi 3 : आज बिग बॉसच्या घरात विकेण्डचा डाव रंगणार आहे. महेश मांजरेकर चावडीवर स्पर्धकांची शाळा घेणार आहेत. प्रोमोमध्ये महेश मांजरेकर मीरा, गायत्री आणि आदिशची शाळा घेताना दिसून आले आहेत. महेश मांजरेकर मीराला बोलत आहेत, मीरा पुढच्या वर्षी तु 'मीच बॉस' नावाचा कार्यक्रम सुरू कर. तर आदिश स्नेहाला त्रास देत असल्याने मांजरेकरांनी त्याची बोलतीच बंद केली आहे. तर आदिशला घरातल्या सदस्यांपैकी कोण रावण वाटतो आहे ते तो सांगताना दिसून येतो आहे. घरातील सदस्य दादूसचा वापर करुन घेत असल्याने मांजरेकरांनी दादूसला स्वत:च्या डोक्याने खेळण्याचा सल्ला दिला आहे.
काल बिग बॉसच्या घरात कॅप्टनसीचा टास्क रंगला होता. त्यात विशाल, सुरेखाताई, स्नेहा या तीन उमेदवारांची निवड झाली होती. एकीकडे मीरा, जय, गायत्री, उत्कर्ष, दादूस, सुरेखाताई आणि स्नेहा होते. तर दुसरीकडे विशाल, विकास, आदिश, सोनाली, मीनल, तृप्तीताई आणि आविष्कार होते. जय आणि त्याचा गट तर दुसरीकडे विकास आणि त्याचा गट रणनीती आखताना दिसून आले होते.
जय सांगताना दिसून आला, एक समर्थक आणि एक सदस्य जाणार आहे. आता सहा जणांची टीम आहे. म्हणजे सुरेखा ताईसाठी तीन आणि स्नेहासाठी तीन सदस्य एकमेकांसोबत न भांडता खेळतील. तर बिग बॉसच्या घरात सुरू असलेल्या 'करुया आता कल्ला' या टास्कमध्ये सुरेखाताईंनी आदिशला सुनावले. त्यामुळे आदिशला सुरेखा ताईंचा प्रचंड राग आलेला होता. त्याने विशाल, विकास, आविष्कार आणि सोनालीसमोर त्याचं मत देखील मांडलं होतं. आदिश म्हणाला,"आता टास्कमध्ये मला जास्त बोलायचं नाही. टास्क होऊन जाऊदेत.
बिग बॉसच्या घरात दर शनिवारी आणि रविवारी महेश मांजरेकर शाळा घेत असतात. तर एका स्पर्धकाला घराबाहेरचा रस्ता पकडावा लागत असतो. मागील रविवारी आदिश वैद्यची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली होती. तो घरात येताच घरातील सदस्यांमध्ये नावडता ठरला होता. या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तर बिग बॉसच्या घरात या आठवड्यातदेखील कॅप्टन नसणार आहे. असे किती आठवडे घरात कॅप्टन नसणार, घर कसे चालणार, कोणते काम कोणी करायचे अशा अनेक विषयावर घरात चर्चा होत आहेत.
बिग बॉसच्या घरात आठवडाभर स्पर्धकांनी टास्कसोबत मजादेखील केली. घरातील सदस्य नवरंगाप्रमाणे पेहराव करत दिसून आले होते. तर स्पर्धकांसाठी 'नवरात्री विशेष' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदस्यांसाठी विविध पदार्थ बिग बॉसतर्फे देण्यात आले होते. त्यावर सदस्यांनी ताव मारला. तर खास नवरात्री विशेष गाण्यावर सदस्यांनी ठेका धरला होता.