मुंबई : एमटीव्हीवरील प्रसिद्ध शो 'रोडीज'चा जज रघुरामचा साखरपुडा झाला आहे. रघुरामने आपली कॅनेडियन गर्लफ्रेण्ड आणि गायिका नताली डि लूसिओसोबत साखरपुडा केला आहे. स्वत: रघुरामने याची माहिती इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली.
रघुरामचा साखरपुडा कॅनडाच्या टोरंटो शहरात झाला. करणवीर वोहरा आणि त्याची पत्नी टीजे सिद्धूही या सोहळ्याला उपस्थित होते. चौघांचा फोटो शेअर करताना रघुरामने 'देसी बॉईज, कॅनेडियन गर्ल्स' असं कॅप्शन दिलं आहे.
पत्नी सुगंधा गर्गसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच रघुरामने साखरपुडा केला. जानेवारी 2018 मध्ये रघुराम आणि सुगंधा वेगळे झाले होते. परस्पर संमतीने दोघांनी दहा वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय घेतला. पण आजही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
नतालीचं बॉलिवूड कनेक्शन म्हणजे तिने 'इंग्लिश विंग्लिश', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'लेडीज Vs रिकी बहल' या सिनेमांमध्ये गाणं गायलं आहे. नताली रघुरामआधी टीव्ही अभिनेता एजाज खानसोबत चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होती.
2016 मधील 'आंखों ही आंखों में' या गाण्यासाठी नताली आणि रघु यांनी एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून ते एकमेकांना आवडू लागले. मागील एक वर्षांपासून ते डेट करत आहेत. हे दोघे वर्षअखेरीस लग्नबंधनात अडकतील अशी शक्यता आहे.