मुंबई : झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील शनाया अर्थात रसिका धबडगावकर मालिका सोडणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. राधिका आणि गुरुनाथ सुभेदार यांच्या संसारात मिठाचा खडा बनलेली शनाया लवकर मालिकेतून एक्झिट घेण्याच्या तयारीत असल्याचं कळतं.

रसिकाला फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शन शिकण्यासाठी न्यूयॉर्कला जायचं आहे. रसिकाने मागील वर्षी अमेरिकेत या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता. यंदा तिला यासाठी प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे ती मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिका टीआरपीमध्येही अव्वल स्थानावर असते. मालिकेतील शनाया ही व्यक्तिरेखा निगेटिव्ह असली तरी प्रेक्षकांना आवडत आहे.

ही मालिका सध्या महत्त्वाच्या वळणावर आहे. मालिकेत राधिका आणि गुरुनाथ घटस्फोटासाठी कोर्टात गेले असताना, रसिका सुनील मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगल्याने निर्मात्यांसमोर नवा पेच उभा राहिला आहे.

आता रसिकाच्या जागी नवी अभिनेत्री येणार की मालिका लवकर गाशा गुंडाळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.