Mi Honar Superstar Jodi Number 1 : 'मी होणार सुपरस्टार' (Mi Honar Superstar) हा कार्यक्रम काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचे विविध पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता या कार्यक्रमाचं नवं पर्व अर्थात ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ (Mi Honar Superstar Jodi Number 1) हा धमाकेदार डान्स रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ काय विशेष असणार?
‘मी होणार सुपरस्टार'च्या या आधीच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे नव्या पर्वाची उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करणार आहेत. आई-मुलगी, गुरु-शिष्य, मामा-भाचे, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती आणि त्यांची नृत्यकला या मंचावर पहाता येणार आहे. त्यामुळे या पर्वात मंचावर नृत्यासोबतच नात्यांमधली गंमतही अनुभवता येईल.
'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन' या कार्यक्रमाच्या सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे सुपरस्टार अंकुश चौधरी (Ankush Choudhary). तर लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.
मराठी सिनेमांमध्ये आपल्या जबरदस्त नृत्यदिग्दर्शनाने वेगळी ओळख निर्माण करणारी सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर (Phulwa Khamkar) आणि हिंदी-मराठी रिऍलिटी शो गाजवणारा नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे (Vaibhav Ghuge) या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत.
'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन' या कार्यक्रमाबद्दल बोलताना अंकुश चौधरी म्हणाला,"मी होणार सुपरस्टारचं प्रत्येक पर्व हे वेगळेपण घेऊन येतं. यावेळेच्या पर्वात जोड्यांची धमाल अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे फक्त नृत्यच नाही तर या मंचावर नात्यांचाही खऱ्या अर्थाने सोहळा होईल".
अंकुश चौधरी पुढे म्हणाला,"पहिल्या दोन्ही पर्वांना भरभरुन प्रेम मिळालं. दोन्ही पर्वातल्या स्पर्धकांच्या मी अजूनही संपर्कात आहे. त्यामुळे या मंचाने मला नवा परिवार दिलाय असं म्हणू शकतो. या पर्वातही नवनव्या स्पर्धकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे".
‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ कधी होणार सुरू?
‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ हा धमाकेदार डान्स रिअॅलिटी शो 9 मार्चपासून दर शनिवार रविवार रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या