Nilesh Sable : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या 10 वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे. लवकरच हा कार्यक्रमाचा 1000 वा भाग प्रसारित होणार आहे. अशातच आता या कार्यक्रमाचा दिग्दर्शक, निवेदक डॉक्टर निलेश साबळे (Nilesh Sable) या कार्यक्रमातून निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. 'कॅप्टन ऑफ द शीप' जहाज सोडणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. 


डॉ. निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या' सोडणार? 


'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे निलेश साबळे घराघरांत पोहोचला आहे.  पण आता यापुढे तो या कार्यक्रमाचा भाग नसणार असल्याची चर्चा आहे. याबद्दल एबीपी माझाशी बोलताना निलेश साबळे म्हणाला,"चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम मी सोडला असल्याची चर्चा आहे. कार्यक्रम सध्या चार-पाच महिन्यांच्या गॅपवर चालला आहे. चॅनलने ठरवलं तर कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. तब्येतीच्या कारणाने मी थोडेदिवस मी कार्यक्रमातून बाहेर असेल". 


डॉ. निलेश साबळेचे चाहते नाराज


'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर डॉ. निलेश साबळेने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. या कार्यक्रमाच्या मंचावर त्याने अनेक कलाकारांच्या नकलाही तितक्याच प्रभावीपणे केल्या आहेत. विनोदाचं कमाल टायमिंग आणि प्रेक्षकांना खूर्चीला खिळवून ठेवणारा विनोदवीर अशी डॉ. निलेश साबळेची ओळख आहे. पण तो आता या कार्यक्रमाचा भाग नसणार असल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत.   


'चला हवा येऊ द्या' बंद होणार असल्याच्या चर्चा


'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा पहिला भाग 2014 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या कार्यक्रमाने बाजी मारली. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. पण काही दिवसांपासून टीआरपीच्या कारणाने हा कार्यक्रम बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. डॉ. निलेश साबळेप्रमाणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ कदम (Bhau Kadam), सागर कारंडे (Sagar Karande), श्रेया बुगडे (Shreya Bugde), कुशल बद्रिके (Kushal Badrike), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) आणि स्नेहल शिदम (Snehal Shidam), सिद्धेश शिंदे (Siddhesh Shinde) हे कलाकार घराघरांत पोहोचले आहेत. 


'असा' होता डॉ. निलेश साबळेचा 'चला हवा येऊ द्या'पर्यंतचा प्रवास (Nilesh Sable Details)


डॉ. निलेश साबळेच्या करिअरमध्ये 'झी मराठी' (Zee Marathi), 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा मोलाचा वाटा आहे. निलेश साबळे व्यावसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहे. पण लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची, नक्कल करण्याची आवड निर्माण झाली. पुढे झी मराठीवरील 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या कार्यक्रमाचा विजेता होत त्याने आपल्या अभिनयप्रवासाची सुरुवात केली. 'होम मिनिस्टर', 'फू बाई फू' या कार्यक्रमांचंही त्याने सूत्रसंचालन केलं. पुढे 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने त्याला चांगलाच ब्रेक मिळाला.


संबंधित बातम्या


Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप? समोर आलं मोठं कारण