Marathi Serial Updates Zee Marathi Announce New Serial : छोट्या पडद्यावर सध्या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी सगळ्याच वाहिन्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'झी मराठी वाहिनी'ने (Zee Marathi) आपल्या नव्या मालिकेची घोषणा केली आहे. आषाढीच्या निमित्ताने या नव्या मालिकेचा फर्स्ट लूक लाँच केला आहे.
टीआरपीच्या शर्यतीत काहीसं मागे पडलेल्या झी मराठीने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मागील काही महिन्यात झी मराठीवर नव्या मालिकांचा धडाका सुरू आहे. आयपीएलच्या काळातही झी मराठीने नव्या मालिका लाँच करण्याचे धाडस दाखवले आणि प्रेक्षक खेचण्यास यश मिळवले. ‘शिवा’, ‘पारू’, 'पुन्हा कर्तव्य आहे' ‘लाखात एक आमचा दादा’ आदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या मालिकांना सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'झी मराठी'ने नवीन मालिकेची घोषणा केली आहे.
नव्या मालिकेचे नाव काय?
आषाढी एकादशीच्या निमित्ताने झी मराठी वाहिनीने आपल्या नव्या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. 'सावळ्याची जणू सावली'असे या नव्या मालिकेचे नाव आहे. ही मालिका विठ्ठलाच्या भक्तीवर आधारीत असल्याचे दिसते. या टीझरमध्ये एक मुलगी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊन मोठ्या भक्तीभावाने आराधना करत असल्याचे दिसते.
व्हिडीओ सोबत “पांडुरंगाची परमभक्त ती, सुरेल तिचा गळा, तुम्हालाही लागेल तिच्या गोड आवाजाचा लळा… ‘सावळ्याची जणू सावली’ ही नवीन मालिका येतेय लवकरच आपल्या भेटीला” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार?
ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, याची उत्सुकता लागली आहे. मात्र, या मालिकेच्या प्रसारणाला आणखी काही अवधी असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आषाढी एकादशीच्या चांगल्या दिवसाच्या निमित्ताने मालिकेची घोषणा करण्यात आली असल्याचेही सूत्रांनी सांगितले. झी मराठीवर आता या नव्या मालिकेसाठी कोणता टाईमस्लॉट दिला जाणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.