किशोरी आमोणकरांनी ‘सहेला रे’ गायलं आणि राग भूप अमर झाला. त्या स्वरांनी जणू विझलेल्या दिव्यांमध्ये पुन्हा अग्नी जागृत केला. काहींना तो अनादिकालाच्या गर्भातून आलेल्या ध्वनीसारखा वाटला. जेव्हा सरस्वतीची वीणा पहिल्यांदा झंकारली होती, स्वर जन्मला होता आणि संगीताची निर्मिती झाली होती, तोच स्वर जणू पुन्हा उमटला होता. म्हणून त्याला ‘गानसरस्वती’चा स्वर म्हटलं गेलं. तो स्वर आज काळाच्या उदरात निमला. गानसरस्वती किशोरी आमोणकरांचं 3 एप्रिल सोमवारी निधन झालं.
किशोरीबाई महान गायिका होणार हे जणू काळाच्या कपाळावर लिहिलेलं सत्य होतं. आई मोगूबाई कुर्डीकरांच्या कडक शिस्तीत त्या तालीम घेत होत्या. अथक रियाज करत होत्या. जयपूर घराण्याचे संस्कार त्यांच्यावर होत होते. पण त्यात वयाच्या 25व्या वर्षी एक अपशकुन घडला. त्यांचा आवाज एकाएकी गेला. इथे अध्यात्म आणि आयुर्वेद कामी आलं. दोन वर्षांत त्या पुन्हा गाऊ लागल्या आणि किशोरीयुग सुरू झालं.
आपल्या अभ्यासपूर्ण आणि भावप्रधान गायकीनं त्यांनी रसिकांवर गारूड केलं. आईच्या आणि घराण्याच्या सावलीत राहूनही त्यांनी गायकीत नवनवे प्रयोग केले. त्यांच्या या बंडामुळे ज्येष्ठ नाराज झाले. पण स्थितप्रज्ञ किशोरीबाईंनी आपली शैली तयार केली आणि पाहता पाहता त्या संगीतक्षेत्रातल्या एक विदुषी झाल्या.
शास्त्रीय गायकीवरची त्यांची श्रद्धा त्यांनी कायम ठेवली. त्याशिवाय जर किशोरीबाईंना कशाने भुरळ घातली असेल तर ती मीरेच्या आणि कबीराच्या भजनांनी. भक्तिरस जणू स्वरांमध्ये ओथंबून आला.
किशोरीबाईंनी संगीत व्रताप्रमाणे मानले. त्यामुळेच ते अथक रियाजाचे आणि कडक शिस्तीचे होते. जी शिस्त त्यांनी पाळली तिची अपेक्षा त्यांनी श्रोत्यंकडूनही ठेवली. जिथं ती पूर्ण झाली नाही तिथं त्यांनी कोणाचीच गय केली नाही. उथळ टाळ्या त्यांना कधीही मिळवायच्या नव्हत्या. एकांत गुहेत संगीतसाधना करणाऱ्या त्या योगिनी होत्या. संगीत हे मनोरंजनाचे साधन नव्हे तर अभ्यासाने सिद्ध होणारी विद्या आहे असे त्या मानत. म्हणूनच 'रागरससिद्धांत' हा संगीतशास्त्रावर ग्रंथराज त्यांनी लिहिला. किशोरीबाईंची शिष्यपरंपराही त्यामुळेच प्रचंड आहे. 85 वर्षांचा हा दैवी स्वर शेवटपर्यंत थकला नाही. सरस्वतीच्या विणेप्रमाणे झंकारत राहिला.
संबंधित बातम्या:
‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर काळाच्या पडद्याआड
'गानसरस्वती'ला संगीत जगतातील मान्यवरांची आदरांजली