Karan Veer Mehra BB Winner : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त शो बिग बॉस सीझन 18 चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला असून यंदाच्या सीझनचा विजेता मिळाला आहे. करणवीर मेहरा यंदाच्या बिग बॉस 18 चा विजेता ठरला आहे. करणवीर मेहराला बिग बॉस 18 च्या विजेत्या ट्रॉफीसह लाखोंचं बक्षीस मिळालं. 6 ऑक्टोबर 2024 रोजी या बिग बॉस 18 सीझनला सुरुवात झाली होती, त्यानंतर 19 जानेवारी 2025 सीझनचा ग्रँड फिनाले मोठ्या धूमधडाक्यात पार पडला.
104 दिवसांच्या प्रवासानंतर मिळाला विजेता
करण वीर मेहरा, विवियन डिसेना, ईशा सिंह, रजत दलाल, अविनाश मिश्रा आणि चुम दरंग हे यंदाच्या सीझनचे टॉप 6 फायनलिस्ट होते. यापूर्वी, बिग बॉस 17 सीझन मुनावर फारुकी याने जिंकला होता, तर एमसी स्टॅन बिग बॉस 16 चा विजेता ठरला होता. बिग बॉस 18 च्या घरातील 104 दिवसांच्या प्रवासानंतर यंदाच्या सीझनचा विजेता मिळाला आहे. विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा टॉप 2 फायनलिस्ट होते, अखेर करणवीर मेहराच्या डोक्यावर विजेत्याचा मुकुट पाहायला मिळाला. सलमान खानने त्याच्या दबंग स्टाईलने हा ग्रँड फिनाले होस्ट केला.
बिग बॉस विजेत्याच्या बक्षिसाची रक्कम किती?
सुरुवातीपासूनच विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांचं नाव विजेत्याच्या शर्यतीत होतं. अखेर करणवीर मेहराने ही शर्यत जिंकली. प्रेक्षकांनी भरघोस मतांनी करणवीर मेहराला चॅम्पियन ठरवलं. बिग बॉस 18 चा विजेता म्हणून, करणवीर मेहरा याला बिग बॉसची चमचमती सोनेरी ट्रॉफी आणि 50 लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आलं. तर विवियन डिसेना यंदाच्या शोचा उपविजेता ठरला.
बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले
अभिनेता सलमान खानने सर्व टॉप सहा फायनलिस्टच्या कुटुंबियांकडून भावनिक संदेश देऊन ग्रँड फिनालेची सुरुवात केली. यानंतर आणि फायनलिस्ट आणि इतर स्पर्धकांच्या काही दमदार परफॉर्मन्स पार पडले. यानंतर नॉमिनेशनला सुरुवात झाली. टॉप 6 फायनलिस्टमधून ईशा सिंह ही पहिली एलिमिनेट होणारी सदस्य ठरली. त्यानंतर अभिनेत्री चुम दरांग पाचव्या स्थानावर बाहेर पडली.
करणवीर मेहरा ठरला बिग बॉस 18 चा विजेता