Jui Gadkari : छोट्या पडद्यावर पदार्पणापासूनच आपल्या अभिनयाने छाप सोडणारी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) कायमच चर्चेत असते. तिची मुख्य भूमिका असलेली 'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत चांगलीच आघाडीवर आहे. या मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जुई साकारत असलेली सायली ही व्यक्तीरेखाही लोकांच्या पसंतीस उतरली आहे. जुई गडकरी ही तरुणांची क्रश आहे. जुईने एका मुलाखतीत आपल्याला आता लग्नगाठ बांधायची असल्याचे म्हटले आहे. या मुलाखतीत तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबतच्या अपेक्षा सांगितल्या आहेत.
प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या जुई गडकरीच्या लग्नाची प्रतिक्षा तिच्या चाहत्यांना आहे. नुकतीच जुईने सुलेखा तळवळकर यांच्या 'दिल के करीब' या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी तिने आपल्या लग्नाबाबत भाष्य केले.
एकत्रित कुटुंबाची सवय...
जुईने सांगितले की, कर्जतमध्ये आमचा वाडा होता. आता बिल्डिंग असून आम्ही सगळेजण एकत्रित राहत आहोत. मला खूप काका-काकी असून लहानपणापासून एकत्रित कुटुंबात राहण्याची सवय असल्याचे जुई गडकरीने सांगितले. मला असंच स्वत:चं मोठं कुटुंब हवं आहे असे तिने सांगितले.
आता मलाही कुटुंब हवं...
जुई गडकरीने सांगितले की, मला हव्या असणाऱ्या या कुटुंबाबाबत विचार केला नाही. अर्थात मलाही माझं कुटुंब हवं आहे. माझ्या मैत्रिणींची मुले 10-10 वर्षांची झाली आहे. त्यामुळे मलाही आता विचार करावा लागणार आहे. देवाने माझ्यासाठी खूप चांगले मार्ग ठेवले आहेत. इतका उशीर होत आहे म्हणजे अर्थात सगळं चांगलंच असेल असेही जुईने म्हटले.
जुईला कसा हवाय मुलगा?
जुईने या मुलाखतीत आपल्या होणाऱ्या पतीबाबत सांगितले की, “मला माझ्यासारखा साधा, सरळ, सोप्पा नवरा हवा आहे. पूर्णतः शाकाहारीही असावा. आणि कुटुंबात रमला पाहिजे असा असावा आणि मुख्य म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करत आहे त्या क्षेत्राला तो समजून घेणारा हवा, असेही तिने सांगितले. तो जेव्हा आमच्या कुटुंबाचा भाग होईल तेव्हा नक्कीच ते त्याचे लाड करतील. हे सर्व सांभाळून त्याने मला सांभाळावं एवढीच इच्छा आहे असेही जुई गडकरीने म्हटले.