Iqbal Khan Birthday Special : बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता इक्बाल खान याचा आज वाढदिवस आहे. इक्बाल आज 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता होण्याचं स्वप्न घेऊन काश्मीरहून मुंबईत आलेल्या इक्बालसाठी सुरुवातीचे दिवस फार कठीण होते. मुंबईत आल्यावर एक काळ असाही होता, जेव्हा त्याच्याकडे जेवणासाठी पैसे नव्हते आणि राहण्यासाठी घरही नव्हतं, पण त्याने कुटुंबियांना या संघर्षाबद्दल सांगितलं नाही. कठीण परिस्थितीवर मात करत नाव कमावलं. आज इक्बाल खान टीव्ही इंडस्ट्रीतील सुपरस्टार असून त्याचं नाव घराघरात पोहोचलं आहे.


बॉलिवूडमध्ये फ्लॉप, पण टीव्ही इंडस्ट्रीचा सुपरस्टार


अभिनेता इक्बाल खानचा (Iqbal Khan) जन्म 10 फेब्रुवारी 1981 रोजी काश्मीरमध्ये झाला. त्याचं पूर्ण नाव मोहम्मद इक्बाल खान आहे. शाळेत असतानाच त्याला अभिनयाची आवड जडलं. पुढे कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांत काम केल्यावर तो मॉडेलिंग आणि ॲक्टिंगसाठी मुंबईत आला. इक्बाल खानचा (Iqbal Khan) टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा असण्यासोबतच बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेलही आहे. अनेकांना माहिती नसेल पण, इक्बालने सुरुवातीला बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं. 


फाल्गुनी पाठकच्या म्युझिक व्हिडीओतून करियरला सुरुवात


इक्बाल खानने त्याच्या करियरची सुरुवात प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठकच्या 'इंधाना मिरवा' या म्युझिक व्हिडीओतून केली.  अभिनेता इक्बाल खानने 2003 मध्ये आलेल्या फनटूश (Fun2shh) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटात अभिनेता परेश रावल यांची महत्त्वाची भूमिका होती. याशिवाय त्याने जलसा चित्रपटात अभिनेत्री विद्या बालनसोबतही काम केलं आहे. याशिवाय त्याने बुलेट एक धमाका, एक छोटी सी ईगो या चित्रपटांमध्येही काम केलं. मात्र, त्याला बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळालं नाही. मोठ्या पडद्यावर अपयश मिळाल्यावर त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि टीव्ही इंडस्ट्रीमुळे त्याचं नशीब पालटलं. सध्या इक्बाल टीव्ही इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.


टीव्ही इंडस्ट्रीने बनवलं सुपरस्टार


'कैसा ये प्यार हैं' मालिकेतून अभिनेता इक्बाल खानने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. या मालिकेतील त्याने साकारलेल्या 'अंगद खन्ना'च्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. हा टीव्ही शो सुपरहिट ठरला आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर त्याने 'काव्यांजली' मालिकेत 'शौर्य नंदा'ची भूमिका साकारली, ज्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. 'कही तो होगा' मालिकेतील रघुनेही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आल्यावर त्याने अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं. 


'या' मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन


एकामागोमाग एक 20 मालिकांमध्ये काम करत अभिनेता इक्बाल खान टीव्ही इंडस्ट्रीचा सुपरस्टार बनला. करम अपना अपना (Karam Apnaa Apnaa), छूना हैं आसमान (Chhoona Hai Aasmaan), रुद्रा (Rudra), संजोग से बनी संगिनी (Sanjog Se Bani Sangini), यहाँ मैं घर-घर खेली (Yahan Main Ghar Ghar Kheli) अशा अनेक हिट मालिकांद्वारे त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या इक्बाल टीव्ही इंडस्ट्रीसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतो. इक्बालची क्रॅकडाउन वेब सीरीज चांगलीच गाजली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Saif-Kareena Divorce : सैफ अली खान आणि करीना कपूरचा घटस्फोट? 'बेबो'ने शेअर केलेल्या पोस्टने एकच खळबळ