मुंबई : सुहेब इलियासीचं सूत्रसंचालन, दिग्दर्शन आणि निर्मिती असलेला 'इंडियाज मोस्ट वाँटेड' हा क्राईम शो नव्वदच्या दशकाच्या अखेरीस चांगलाच लोकप्रिय ठरला होता. तब्बल 30 गुन्हेगारांना गजाआड करण्यासाठी पोलिसांना मदत करणारा हाच सुहेब पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरला आहे.


1998 मध्ये झी टीव्हीवर 'इंडियाज मोस्ट वाँटेड' हा शो सुरु झाला. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील हा पहिला वहिला क्राईम शो मानला जातो. झी टीव्हीवर सुरु झालेल्या 'इंडियाज मोस्ट वाँटेड'ची निर्मिती सुहेब इलियासीची. अँकरिंगच्या अत्यंत आगळ्यावेगळ्या शैलीमुळे सुहेब इलियासी आणि हा शो लोकप्रिय झाला.

एखाद्या टीव्ही शोच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे पोलिसांसाठीही हा कार्यक्रम मदतशीर ठरला.

'इंडियाज मोस्ट वाँटेड'ची सुरुवात

1991 मध्ये सुहेब इलियासी टीव्ही एशियासाठी कॅमेरामन म्हणून लंडनला गेला. 1995 मध्ये त्याने पत्नी अंजूसोबत एका क्राईम शोसाठी पायलट एपिसोड तयार केला. अनेक वाहिन्या हा शो सुरु करण्यासाठी उत्सुक नव्हत्या, मात्र झीने होकार दिला. मार्च 1998 मध्ये 'इंडियाज मोस्ट वाँटेड'चा पहिला शो ऑन एअर गेला.

सुरुवातीला या क्राईम शोचे 52 भाग ठरले होते, मात्र झीने काँट्रॅक्ट वाढवलं. या शोचा टीआरपी 10-12 पर्यंत गेला होता.

या कार्यक्रमात दाखवलेला वाँटेड हिटमॅन 'श्री प्रकाश शुक्ला'ला पोलिसांनी संपवलं. मात्र त्याचं श्रेय सुहेबने लाटल्याचा आरोप पोलिसांनी केला.

पत्नीच्या हत्येप्रकरणी क्राईम शोच्या अँकरचा फैसला


या शो मुळे आपल्याला धमक्या येत असल्याचा दावा सुहेबने केला. 1999 मध्ये त्याने केलेली पोलिस संरक्षणाची मागणी पूर्ण करण्यात आली.

पार्टनरसोबत झालेल्या वादानंतर सुहेबने डीडी म्हणजे दूरदर्शनसोबत काम करण्यास सुरुवात केली. 'फ्युजिटिव्ह मोस्ट वाँटेड' असं या शोचं नामकरण करण्यात आलं. या शोचे कॉपीराईट्स झीकडे असल्यामुळे अँकर बदलून शो सुरु ठेवण्यात आला.

2015 मध्ये या शोचा दुसरा सीझन इंडिया टीव्हीवर लाँच करण्यात आला. मात्र पहिल्या पर्वाइतकी लोकप्रियता 'इंडियाज मोस्ट वाँटेड' मिळू शकली नाही.



पत्नीच्या हत्या प्रकरणी दोषी

11 जानेवारी 2000 रोजी सुहेबची पत्नी अंजू इलियासीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. सुहेबने आधी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला. अंजूचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचा बनाव त्याने केला, मात्र 17 वर्षांनी दिल्लीतील कनिष्ठ कोर्टाने अंजूच्या हत्येप्रकरणी सुहेबला दोषी ठरवलं.

सुहेबने पत्नीच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी आपल्या मित्राला दिली होती. तिने आत्महत्या केल्याचं सुहेबने सांगितलं. मात्र अंजूच्या कुटुंबीयांना याबाबत समजताच त्यांचं पित्त खवळलं. अंजू आत्महत्या करुच शकत नाही, तिच हत्या झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. मार्च 2000 मध्ये सुहेबला हुंडा आणि हत्येच्या आरोपातून बेड्या ठोकण्यात आल्या. काही दिवसांतच तो जामिनावर बाहेर आला. अंजूच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली. 2014 मध्ये हत्येच्या आरोपाखाली तपास करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले.

कात्रीने वार करुन अंजूची हत्या झाल्याचं समोर आलं. दोघांमध्ये अनेक वेळा खटके उडत असल्याचं समोर आलं. सर्व पुरावे पाहून कोर्टाने सुहेब इलियासीला अंजूच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं.

1989 मध्ये अंजू आणि साहेब एकत्र शिकत होते. त्यावेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अंजूच्या कुटुंबाचा दोघांच्या नात्याला विरोध होता. विरोधानंतरही 1993 मध्ये दोघांनी लंडनमध्ये लग्न केलं. मात्र सातच वर्षात दोघांच्या नात्यात कटुता यायला सुरुवात झाली.