मुंबई : छोट्या पडद्यावरील नावाजलेली अभिनेत्री जया भट्टाचार्य सध्या मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत जयाने सांगितलं की, "तिला आर्थिक चणचण आहे. ती दिवाळखोरीच्या मार्गावर आहे."

जयाने लोकप्रिय मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मध्ये पायल मेहरा ही निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारली होती. तर कलर्सवरील 'प्यार की थपकी' मालिकेत तिने वसुंधर नावाची भूमिका साकारली होती. हीच तिची अखेरीची मालिका होती.



मुलाखतीदरम्यान जयाने सांगितलं की, "तिच्या 79 वर्षीय आईला हृदयरोग असून तिच्यावर 26 नोव्हेंबरपासून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माझ्याकडील सर्व पैसे संपले असून कामाची अतिशय गरज आहे. माझ्या घराच्या रेनोव्हेशन कॉन्ट्रॅक्टमुळे माझी बँक खाती रिकामी झाली आहेत. मी सध्या भावाच्या घरी राहत आहे. मला निर्णय घेण्याचं किंवा कोणतीही गोष्ट करण्याचं स्वातंत्र्य असलं तरी, कोणावर अवलंबून राहणं किंवा एखाद्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणं, असं माझ्या आयुष्यात कोणीही नाही. मी कणखर महिला असून कधीही हार मानली नाही आणि मानणारही नाही. पण सध्या मी अतिशय अडचणीत असून मला कामाची नितांत गरज आहे."

जया भट्टाचार्यने अनेक टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'कसम से', 'केसर', 'हातिम', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'अंबर धारा, कैसा ये प्यार है', 'गंगा' यांसारख्या मालिकेत जयाने काम केलं आहे. तर देवदास, लज्जा, फिझा या सिनेमातही ती दिसली होती.