Aadesh Bandekar : आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांनी काही दिवसांपूर्वी 'सुप्रिया सचिन शो-जोडी तुझी माझी' या सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर) (Supriya Pilgaonkar) यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी 'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले बांदेकर भाऊजी जुन्या आठवणींमध्ये भावूक झालेले पाहायला मिळाले. आदेश बांदेकर दिवंगत भाऊ संदेश बांदेकर (Sandesh Bandekar) यांच्या आठवणीत भावूक झाले होते. 


भावाची आठवण क्षणोक्षणी येते : आदेश बांदेकर


आदेश बांदेकर दिवंगत भाऊ संदेश बांदेकर यांच्या आठवणीत भावूक होत म्हणाले की,"आम्ही पूर्वी बोरिवलीत राहत होतो. नंतर माझा मोठा भाऊ संदेश बांदेकर आज दुर्दैुवाने तो या जगात नाही. पण एक दिवस त्याने मला समोर बसवलं आणि सांगितलं की, आदेश अभ्युदयनगरला काळाचौकीत आपलं एक घर आहे. तुम्ही दोघांनी तिथे राहावं. मला एकदम प्रश्न मला की, 350-400 रुपये पगार त्याच्यात महिना काढायचा. कसं शक्य? असं माझ्या मनात आलं. पण त्याने सांगितलं की, आदेश तू तिथे राहायला जा. तुला जे लागेल ते आम्ही देऊ. पण नाही मागितलंस तर जास्त आनंद होईल".


आदेश बांदेकर पुढे म्हणाले,"पुढे आम्ही दोघे अभ्युदयनगरमध्ये राहायला गेलो. त्यावेळी आम्ही 25 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्या घरात गेल्यानंतर काही छोटी-मोठी भांडी घेतली आणि आमचा छोटासा संसार सुरू झाला. आज दादा नसला तरी त्याची आठवण आम्हाला क्षणोक्षणी येते. त्याने एक वेगळा आत्मविश्वास दिला आहे. अभय म्हणजे सुचित्राच्या बहिणीचे मिस्टर यांचं आमच्या संसारात मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. नकळत घरातल्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी मदत केली आहे. आज सगळं आहे पण ती माणसं नाहीत". 


तिसऱ्या दिवशी सगळं घर हललं होतं...


आदेश बांदेकर म्हणाले की,"माझा दादा गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी सगळं घर हललं होतं. त्यावेळी आमची वहिनी स्टाँग होती. जिथे आम्हाला समोर बसवलं आणि सांगितलं, तो गेलेला नाही. तो परदेशात गेला आहे. तो परत येणार आहे. तेव्हा काही झालं नाही समजून आम्ही सगळे कामाला लागलो. वहिनी असावी तर अशी". 


आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी घेतलेला महत्त्वाचा निर्णय


'सुप्रिया सचिन शो-जोडी तुझी माझी' या कार्यक्रमादरम्यान सुचित्रा बांदेकर म्हणाल्या,"खरंतर 90 साली जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की, आपण दोघं प्रेमाखातर एकमेकांसोबत राहु शकतो. वाईट परिस्थितीत राहु शकतो. पण आपण एखाद्या जीवाला जन्म नाही द्यायचा. जोपर्यंत आपण त्याला पूर्णपणे पोसण्याची आपली शारिरीक, मानसिक, आर्थिक गरज भागवू शकतो. आमच्या लग्नाच्या सात वर्षानंतर सोहमचा जन्म झाला". 



संबंधित बातम्या


Mumbai Indians : 'होम मिनिस्टर'मध्ये छोटे भाऊजी, मुंबई इंडियन्सचा टीम डेव्हिड झळकणार आदेश बांदेकरांच्या कार्यक्रमात?