Hemangi Kavi :  अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आपल्या अभिनयासोबतच हेमांगी कवी सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या पोस्टमुळेही चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिच्या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे. हेमांगीने हिंदी मालिका पुरस्कार सोहळ्यातील आपला अनुभव शेअर केला आहे. आपल्या मराठी भाषेला मिळालेलं प्रेम पाहून कायच्या काय भारी वाटतंय असे हेमांगीने म्हटले. 


हेमांगी कवी ही झी वाहिनीवरील 'कैसे मुझे तुम मिल गए' या हिंदी मालिकेत भवानी चिटणीस ही व्यक्तीरेखा साकारत आहे. झी वाहिनीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'झी रिश्ते अवॅार्डस् 2024' मध्ये हेमांगीला सर्वोत्कृष्ट आई अर्थात Best Maa या श्रेणीत पुरस्कार मिळाला. आनंदाने पुरस्कार स्वीकारण्यासाठी रंगमंचावर गेलेल्या हेमांगीने मराठीत आपले मनोगत मांडण्यास सुरुवात केली. त्यावेळी समोर बसलेल्या कलाकारांमधून 'जय महाराष्ट्र'ची घोषणा आली. तेव्हा उर भरून आला, बळ आले असल्याचे हेमांगीने म्हटले. मातृभाषेत मनोगत व्यक्त केल्यानंतर इतर अमराठी कलाकारांनी त्याचे कौतुक केले असल्याचे हेमांगीने सांगितले. आपलं आपल्या भाषेवर अतोनात प्रेम असलं की आपण दुसऱ्या भाषेवर ही तितकंच प्रेम करतो! आपल्या मराठी भाषेला मिळालेलं प्रेम पाहून कायच्या काय भारी वाटतंय अशी भावना तिने व्यक्त केली. 


हेमांगी कवीने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले?


हेमांगीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, काल #मातृभाषदिन होता आणि कालच मला झी रिश्ते अवॅार्डस् 2024 मध्ये माझ्या ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या हिंदी मालिकेतल्या ‘भवानी चिटणीस’ या व्यक्तीरेखेसाठी ‘Best Maa’ चा पुरस्कार मिळाला! माझ्यासाठी हा एक सुखद धक्काच होता. रंगमंच्यावर गेल्यावर कळेना कुठल्या भाषेत माझ्या भावना व्यक्त कराव्या कारण समोर बसलेले बहुतांश लोक हिंदी भाषिक होते. मला हे माहीत असतानाही माझ्या तोंडून माझी मातृभाषा आली. ऐकणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी नम्रपणे माफी मागून मराठीत बोलू लागले आणि जेव्हा समोरून ‘जय महाराष्ट्र’ ऐकू आलं तेव्हा तर उर भरून आला, बळ मिळालं! त्यानंतर ज्या प्रकारे @arjunbijlani आणि @haarshlimbachiyaa30 ने मराठीत बोलल्यावर प्रोत्साहन दिलं तेव्हा तर आहाहा खूपच भारी वाटलं! रंगमंच्यावरून खाली आल्यानंतर बऱ्याच हिंदी भाषिक कलाकारांनी मी मराठीत व्यक्त झाल्याचं कौतुक केलं!
आपलं आपल्या भाषेवर अतोनात प्रेम असलं की आपण दुसऱ्या भाषेवर ही तितकंच प्रेम करतो!
आपल्या मराठी भाषेला मिळालेलं प्रेम पाहून कायच्या काय भारी वाटतंय!
जय महाराष्ट्र!


 







हेमांगीने ट्रोलर्सला दिलंय सडेतोड उत्तर


अभिनेत्री हेमांगी कवीच्या याआधी काही पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यावेळी  तिच्या पोस्टवर आक्षेप घेत हेमांगीवर टीका करण्यात आली होती. तिचे ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हेमांगीने या ट्रोलर्सला थेट सडतोड प्रत्युत्तर दिले. 'बाई, बुब्स आणि ब्रा...' ही हेमांगीची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. त्यानंतर काहींनी अभिनेत्रीला ट्रोल केलं तर काहींनी मात्र तिच्या या पोस्टचं कौतुक केलं. पण या पोस्टरनंतर येणारी हेमांगी कवीची प्रत्येक पोस्ट ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरू लागली आणि ट्रोलर्स मंडळी ट्रोल करू लागले. पण अभिनेत्री मात्र या ट्रोलर्स मंडळींना पुरून उरली.