Happy Bithday Ekta Kapoor : मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आज (7 जून) आपला 47वा वाढदिवस साजरा करत आहे. एकताने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी कैलाश सुरेंद्रनाथ यांच्या जाहिरात आणि चित्रपट निर्मिती कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. इथूनच तिने तिच्या करिअरची सुरुवात केली. याकाळात तिने निर्मिती क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यात तिला अपयश आले.


पहिल्या अपयशानंतर, एकताने तिच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार स्वतंत्र्य निर्माती बनण्याचा निर्णय घेतला. यानंतर एकताने 1994मध्ये वडिलांच्या मदतीने ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची सुरुवात केली. आपल्या या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत एकताने जवळपास 130हून अधिक मालिकांची निर्मिती केली आहे. म्हणूनच एकताला ‘टेलिव्हिजनची राणी’ म्हटले जाते. तिने निर्मिती केलेल्या ‘या’ मालिका प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहिल्या आहेत.


हम पाँच


‘झी टीव्ही’वरील ‘हम पाँच’ ही मालिका कोण विसरू शकेल? या मालिकेची खास गोष्ट म्हणजे या मालिकेत एकही पुरुष नायक नव्हता. नायकाची जागा भरून काढणाऱ्या पाच मुली होत्या. या पाच मुलींमध्ये अडकलेला बाप कसा असहाय्य झाला, ही या मालिकेची कथा होती. या असहाय्य वडिलांची भूमिका अभिनेते अशोक सराफ यांनी साकारली होती. 1995ला सुरु झालेली ही मालिका 1999पर्यंत टीव्हीवर दाखवली जात होती.


क्यूंकी सास भी कभी बहू थी


‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेपासून टीव्ही विश्वात ‘सासू-सुने’च्या मालिकांचा ट्रेंड सुरु झाला. या मालिकेत एकताने अशी भूमिका निर्माण केली की, त्यानंतर त्या तोडीची भूमिका आजतागायत झालेली नाही. 2001 ते 2005 या काळात या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिके म्हणून ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार’ पटकावला होता. 8 वर्षे चाललेल्या या मालिकेचे 1800हून अधिक भाग दाखवण्यात आले आणि त्यातील सगळ्या भूमिका आजही सर्वांच्या स्मरणात आहे.


कसौटी जिंदगी की


2001पासून सुरू झालेल्या या मालिकेने एकताच्या सास-बहू मालिकेचा ट्रेंड आणखी मोठा केला. या मालिकेतून एकताने अभिनेता श्वेता तिवारीला सुपरस्टार बनवले होते. या मालिकेत दाखवलेली अनुराग आणि प्रेरणा यांची कहाणी घराघरात प्रसिद्ध झाली. या दोन्ही पात्रांच्या मृत्यूनंतरच ही मालिका संपवण्यात आली होती.


कहानी घर घर की


‘सास भी कभी बहू थी’ आणि ‘कहानी घर घर की’ या मालिकेची सुरुवात एकाच वेळी झाली होती. या मालिकेमुळे अभिनेत्री साक्षी तन्वरची कारकीर्द यशाच्या शिखरावर पोहोचली होती. एक आदर्श सून आपल्या घरातील छोट्या-छोट्या समस्यांशी कसा संघर्ष करून संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवते, या भोवती दिर्णारी ही कथा होती. ही मालिका 8 वर्षे चालली.


नागिन


सध्या टीव्हीवर सुरु असलेली ‘नागिन’ ही मालिका एकतासाठी खूप खास आहे. कारण, एकताने या मालिकेतून तिचा ‘सास-बहु’चा सेट पॅटर्न तोडला आणि प्रेक्षकांना फॅन्टसी कथा पडद्यावर दाखवली. 2015 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेचा सध्या 6वा सीझन सुरु आहे.


हेही वाचा :