Maharashtrachi Hasyajatra Gaurav More :  छोट्या पडद्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  (Maharashtrachi Hasyajatra) हा कॉमेडी शो तुफान लोकप्रिय आहे. या शोमधील कलाकारांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. विविध विषयावरील दमदार स्किट्स, विनोदाचं अचूक टायमिंग यामुळे शो चांगलाच लोकप्रिय आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील विनोदवीर गौरव मोरे (Gaurav More) आता हिंदीतील छोटा पडदा गाजवण्यास सज्ज झाला आहे. गौरव मोरे हा सोनी वाहिनीवरील  'मॅडनेस मचाएंगे' शोमध्ये झळकणार आहे. त्याचा प्रोमो नुकताच लाँच झाला आहे. 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कॉमेडी शोमध्ये गौरव मोरेने 'आय एम  गौरे मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा' असे म्हणत विनोदाच्या टायमिंगमुळे घराघरात लोकप्रिय झाला आहे. आता गौरव मोरे हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप सोडण्यास सज्ज झाला आहे. 'मॅडनेस मचाएंगे' या शोमध्ये काही कलाकारांची एन्ट्री झाली असून त्यात गौरव मोरेचा ही समावेश आहे. सोनी वाहिनीने नुकताच या एपिसोडचा प्रोमो लाँच केला. या प्रोमोत एका स्किटमध्ये गौरव मोरेसह हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके आहेत. त्यामध्ये या तिघांच्या कॉमेडीची धमाल दिसून आली आहे.  हिंदीतील कॉमेडी शोमध्ये हे त्रिकूट धमाल करणार असल्याचे दिसून येत आहे.










गौरव मोरे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडणार?


'मॅडनेस मचाएंगे' मध्ये काम करत असल्याने आता  गौरव महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चाहत्यांनी गौरवला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडू नका असाही सल्ला दिला आहे. मात्र, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, गौरव हा शो सोडणार नसल्याची माहिती समोर येत आहे.


चाहत्यांकडून अभिनंदनांचा वर्षाव 


गौरव मोरे आता हिंदीमधील कॉमेडी शो गाजवण्यास सज्ज झाल्याने चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या शोसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. गौरव मोरे हा आगामी 'अल्याड पल्याड' या चित्रपटात झळकणार आहे. त्याशिवाय, 'महापरिनिर्वाण' या चित्रपटातही भूमिका साकारणार आहे.