मुंबई : महाराष्ट्राच्या लाडक्या 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'लय आवडतेस तू मला' ही मालिका पाहताना प्रेक्षक बेभान होणार आहेत. तमाम महाराष्ट्रावर निराळी जादू करायला ही नवी मालिका सज्ज आहे. प्रेक्षकांच्या काळजाला हात घालण्यात मालिका यशस्वी ठरेल. एका सरळ रेषेत चालणाऱ्या आयुष्याचं, समाजाचं, हाडा-मासाच्या लोकांचं, त्यांच्या प्रेमाचं सत्य मांडणारी ही मालिका आहे. सानिका आणि सरकार या दोन पात्रांसह त्यांच्या गावांभोवती फिरणारी ही मालिका आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेची पहिली झलक समोर आली असून प्रेक्षकांना आता मालिकेची उत्सुकता आहे. सानिका मोजर आणि तन्मय जक्का हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. महाराष्ट्रात आता फक्त एकच आवाज घुमणार – 'लय आवडतेस तू मला!'. येतेय नवी गोष्ट 'लय आवडतेस तू मला' - 14 ऑक्टोबरपासून रात्री 9:30 वा. आपल्या 'कलर्स मराठी'वर.
सानिका आणि सरकार या दोन एकमेकांवर प्रेम करणाऱ्या पात्रांभोवती फिरणारी '#लय आवडतेस तू मला!' ही मालिका आहे. दोन प्रेम करणाऱ्यांच्या कुटुंबांना त्यांचं प्रेम मान्य नाही अशा अनेक प्रेमकथा आजवर आपण पाहिल्या आहेत. पण साखरगावची अल्लड सानिका आणि कळशी गावचा रांगडा सरकार यांच्या प्रेमकथेला तर त्या दोघांच्या गावांचाच विरोध आहे. कारण या गावांमध्ये आहे पिढीजात वैर... जे एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे बघत नाही, अशा वातावरणात बहरणार का सानिका आणि सरकारचं अल्लड प्रेम? शत्रूत्वाच्या आगीत फुलणाऱ्या ही आगळीवेगळी प्रेमकथा उलगडणारी गोष्ट म्हणजे 'लय आवडतेस तू मला'. छोट्या पडद्यावरील प्रेम कथेची चौकट मोडण्याचा धाडसी प्रयत्न 'लय आवडतेस तू मला' या मालिकेत करण्यात आला आहे. आता छोट्या पडद्यावर प्रेम आणि शत्रूत्वाचा रंजक खेळ रंगणार आहे. गावाकडच्या गुलाबी प्रेमाची थरारक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तरुण वर्गासह सर्वांनाच आकर्षित करणारी ही मालिका आहे. थरार, नाट्य, रोमान्स अन् बरचं काही प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल.
'लय आवडतेस तू मला' मालिकेतील सानिका खूपच निरागस, भावूक, जिद्दी आणि प्रेमळ आहे. तर सरकार तिच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. तो गावचा छावा आहे. अत्यंत रावडी त्याचं व्यक्तिमत्त्व आहे. एका वेगळ्याच संघर्षातून फुलणारं प्रेम प्रेक्षकांना या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेत सानिकाचे वडील साहेबराव पाटील यांच्या भूमिकेत संजय खापरे आहेत. साहेबराव पाटील हे साखरगावच्या साखरकारखान्याचे मालक आहेत. तर सरकारचे वडील हे साखरकारखान्यातील कामगारांचे यूनियन लिडर आहेत. अभिनेते किरण माने या मालिकेत सरकारच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. 'लय आवडतेस तू मला' मालिकेबद्दल बोलताना प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) - केदार शिंदे म्हणाले,"कलर्स मराठी' वाहिनीवर सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. 'लय आवडतेस तू मला' ही मालिकादेखील याचाच एक भाग आहे. प्रेक्षकांनी आजवर अनेक प्रेम कथा पाहिल्या असतील. पण ही झन्नाट लव्हस्टोरी मात्र यासगळ्यापेक्षा वेगळी आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही मालिका आहे. फ्रेश जोडी, रांगडी कथा, गावरान बाज अशा मालिकेतील अनेक गोष्टींची प्रेक्षकांना नक्कीच भूरळ पडेल".