मुंबई : पन्हाळगडाच्या कडेकोट वेढ्यातून निसटून विशाळगडावर पोहोचेपर्यंतचा थरार अंगावक काटा आणणारा आहे. स्वराज्यसंघर्षातील रणसंग्रामात सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून, खडतर मार्गावरून पन्हाळा ते विशाळगड असा प्रवास शिवरायांनी आणि त्यांच्या 300 बहाद्दर मावळ्यांनी केला. अंगावर शहारे आणणारा या रक्तरंजित पर्वाचा इतिहास सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’या मालिकेच्या येत्या भागांतून उलगडणार आहे.


प्रतापगडाचा पराभव आदिलशहाला चांगलाच जिव्हारी लागला. या पराभवानंतर आदिलशहाने सिद्धी जौहरला महाराजांच्या बंदोबस्तासाठी पन्हाळ्यास पाठवले. प्रचंड पावसात वेढा चालवणं विजापूरी सैन्यास अशक्य होईल हा छत्रपती शिवरायांचा अंदाज सिद्धीने खोटा ठरवला. या कडेकोट वेढ्यातून निसटून जाण्यासाठी निवडक मावळे घेऊन दुर्गम मार्गाने विशाळगडाकडे भर पावसात रात्रीच्या वेळी निसटण्याची मोहीम महाराजांनी आखली. या मोहिमेतील शिवा काशिदांचे हौतात्म्य, बाजी-फुलाजी बंधूंचा पराक्रम, बांदलांच्या अज्ञात मावळ्यांचे शौर्य आणि बलिदान, विशाळगडाच्या पायथ्याशी महाराजांचा घनघोर संग्राम या साऱ्या पराक्रमी प्रसंगांची गाथा या विशेष भागातून उलगडणार आहे.


सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवरायांची सुटका हा मराठेशाहीच्या इतिहासातील रोमांचक अध्याय मालिकेतून प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यत पोहचावा यासाठी मालिकेच्या टीमने विशेष मेहनत घेतली आहे. कृत्रिम पावसाच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी हे सारे प्रसंग चित्रित करण्याचे जिकीरीचे आव्हान मालिकेच्या संपूर्ण टीमने पेलल्याचे निर्माते सांगतात. या पराक्रमी इतिहासाला प्रेक्षकांना या आठवड्यात बुधवार ते शुक्रवार पाहायला मिळणार आहे.


..आणि छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पुन्हा एकदा डॉ. अमोल कोल्हे


दरम्यान गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका टीव्हीवर दाखल झाली. आजपर्यंत पडद्यावर आलेल्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित अनेक मालिका, सिनेमा, नाटक यामध्ये जिजाऊंच्या व्यक्तिमत्वावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहेच. स्वराज्याचा इतिहास मांडताना तो जिजाऊंच्या कार्याविषयी सांगितल्याशिवाय पूर्णच होणारा नाही. पण संपूर्णपणे जिजाऊंचा जीवनप्रवास दाखवणारी एकही मालिका तयार झाली नव्हती. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील मुख्य कलाकार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून या मालिकेची निर्मिती करण्यात आली.