छोट्या पडद्याने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. घराघरांत पाहिला जाणारा हा छोटा पडदा लोकप्रिय होतानाच, त्या छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या अनेक व्यक्तिरेखाही तितक्याच लोकांना भावल्या. फार आधी गंगाधर टिपरे, ब्योमकेश बक्षी अशा व्यक्तिरेखा गाजल्याच. पण तसंच प्रेम लोकांनी श्री-जान्हवीवरही केलं. अशाच भूमिकेतली एक दैवी भूमिका होती ती छत्रपती शिवाजी महाराजांची. ही भूमिका अविस्मरणीय बनवली ती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी. आता अमोल पुन्हा एकदा छत्रपतींच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत.


राजा शिवछत्रपती मालिकेतून पहिल्यांदा डॉ. कोल्हे छोट्या पडद्यावर शिवाजी महाराज म्हणून अवतरले. ही भूमिका त्यांनी अजरामर केली, इतकी की लोकांनी डॉ. अमोल यांच्यात शिवाजी महाराज दिसू लागले. पुढे अनेक नाटकांतूनही त्यांनी ती भूमिका साकारली. शिवाजी महाराजांच्या महानाट्यातूनही ते दिसले. शिवाजी महाराज म्हणजे डॉ. कोल्हे असं समीकरण झालं. असं असतानाच संभाजी राजांवरच्या मालिकेतून ते संभाजी महाराज बनूनही आले. रसिकांनी त्यांच्या या व्यक्तिरेखेवरही अमाप प्रेम केलं. पण आता अमोल पुन्हा एकदा छत्रपती शिवराय बनणार आहेत.


राज्यातल्या थिएटर्सना प्रतीक्षा गर्दी खेचणाऱ्या चित्रपटांची, 40 मराठी चित्रपट थिएटरवर धडकण्याच्या तयारीत


सध्या सोनी मराठीवर चालू असलेल्या स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे शिवराय बनून येणार आहेत. सध्या मालिकेतले शिवराय लहान आहेत. पण आता मालिकेतला काळ कूस बदलणार आहे आणि शिवराय मोठे होणार आहेत. ही भूमिका अमोल करणार आहेत. शिवराय मोठे होणार म्हणजे साहजिकच जिजाऊ माता वृद्धत्वाकडे झुकतील. तर मिळालेल्या माहितीनुसार जिजामाता यांची व्यक्तिरेखाही आता एखादी अनुभवी, ज्येष्ठत्वाकडे झुकलेली अभिनेत्री साकारेल. अमोल यांना शिवराय साकारून मिळालेली लोकप्रियता आणि लोकाश्रय पाहता मालिकेच्या टीआरपीच्या गणितावर याचा परिणाम होईल यात शंका नाही. शिवाय या मालिकेचे निर्मातेही डॉ.अमोल कोल्हे यांची जगदंब क्रिएशन्स ही संस्थाच आहे. अमोल गेल्या काळात संभाजी बनून लोकांसमोर आले असले तरी त्यांना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून अनेक महिने लोटले आहेत. आता तोच आनंद रसिकांना पुन्हा घेता येईल.


लवकरच शिवरायांच्या भूमिकेतून अमोल कोल्हे चित्रिकरणाला सुरुवात करतील. साधारण डिसेंबरच्या उत्तरार्धात कोल्हे यांनी साकारलेले शिवराय घराघरांत पाहता येतील असं नाव न सांगण्याच्या अटीवर जिजामाता मालिकेच्या सेटवरच्या एका व्यक्तीने सांगितलं.