BJP Poster Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Character :  लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या पक्षाकडून प्रचाराचा नारळ फोडला जातोय. त्याचप्रमाणे अनेक माध्यमातून प्रत्येक पक्षाकडून त्यांचा त्यांचा प्रचार करण्यात येतोय. नुकतच भाजपकडून (BJP) जारी करण्यात आलेल्या एका पोस्टरमध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या कार्यक्रमातील पात्रांचा वापर करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर या पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे. पण यावर काहींनी आक्षेप घेत एका कार्यक्रमातून पक्षाचा प्रचार कसा होऊ शकतो असा सवाल उपस्थित केला आहे. यावर निर्मात्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 


लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर आचारसंहितेची मर्यादा पक्षांपुढे आहे. त्यामुळे प्रचार करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी प्रत्येक पक्षाला घ्यायची आहे. त्यामुळे भाजपकडून जारी करण्यात आलेलं हे पोस्टर अनेकांना आवडलं आहे, तर काहींनी आचारसंहितेचा हा भंग असल्याचं म्हटलं आहे. पण यावर निर्मात्यांनी प्रतिक्रिया देत हे अजिबात चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे. 






निर्माते आसितकुमार मोदी काय म्हणाले?


तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाचे निर्माते आसितकुमार मोदी यांनी आज तक सोबत बोलताना यावर भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की,मला या पोस्टबद्दल काही वेळापूर्वी कळले. यात काही आक्षेपार्ह आहे असे मला वाटत नाही. ही एक चांगल्या हेतूने केलेली पोस्ट आहे आणि पक्षाला मत देण्यासाठी कोणावरही प्रभाव यामधून टाकला जात नाहीये. त्यामुळे मला यात काही गैर वाटत नाही. याआधी शोच्या निर्मात्यांनी 'स्वच्छ भारत मिशन'ला प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. 2019 मध्ये, शोने आपल्या कथानकाद्वारे मतदानाच्या मुद्द्याचा प्रचार देखील केला होता. 


इतर कोणत्या पक्षाने कार्यक्रमातील पात्रांचा वापर केला तर?


दरम्यान या कार्यक्रमातील काही गोष्टींमुळे हा कार्यक्रम भाजपशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं. यावर  इतर कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांच्या शोमधील पात्रांचा स्वतःच्या प्रचारासाठी वापर केल्यास त्यांना काही आक्षेप असेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटलं की, 'खरं सांगायचं तर ते कोणत्या प्रकारचा कंटेंट तयार करत आहेत यावर सर्व अवलंबून आहे. सोशल मीडियावर कंटेट क्रिएट करताना अनेक जण आमच्या पात्रांचा वापर करतात. मात्र असे काही आम्हाला सांगितल्यास आम्ही त्याची नक्कीच चौकशी करू. शोची टीम नेहमीच सोशल मीडियावर लक्ष ठेवू शकत नाही, असेही ते म्हणाले.


ही बातमी वाचा : 


राहुल गांधी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहायला येणार असतील तर मी अख्खं थिएटर बुक करेन: देवेंद्र फडणवीस